कोल्हापूर ः
येत्या हंगामात (ऑक्टोबर 2024 ते सप्टेंबर 2025) जगाच्या साखर उत्पादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत 50 लाख टनांपर्यंत वाढ होण्याचा अंदाज झार्निको या आंतरराष्ट्रीय व्यापर संस्थेने व्यक्त केला आहे. ही वाढ फारशी नसली तरी पूर्वीच्या अंदाजाच्या तुलनेत अधिक असल्याने संस्थेने सांगितले. या हंगामात साखरेचे उत्पादन 1860 लाख टनांपर्यंत जाण् याची शक्यता असल्याचेही संस्थेने आपल्या अंदाजात म्हटले आहे.
ब्राझीलमध्ये वाढणारे उत्पादन, युरोपीय देश व थायलंडमधील साखरेेची संभाव्य वाढ गृहीत धरून हा वाढीचा अंदाज संस्थेना दिला आहे. साखरेचा खपही लोकसंख्या वाढीमुळे 1800 लाख टनांच्या पुढे अपेक्षित धरण्यात आला आहे. यापूर्वी कंपनीने ब्राझीलमधील साखरेच्या हंगामाची धीमी सुरूवात पाहून साखरेचे उत्पादन काहीसे कमी होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. सध्या ब्राझीलमध्ये साखर हंगामाने गती घेतल्याने संस्थेने उत्पादन वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. युरोपीय देशांमध्ये 170 लाख टन साखरेचे उत्पादन होण्याची शक्यता आहे.
जगात ब्राझील साखर उत्पादनात अग्रेसर आहे. सध्या तेथील हंगाम एप्रिलपासून सुरू झाला. पहिल्या महिन्यात उत्पादनात आघाडी घेतली असली तरी दुसर्या महिन्यात मात्र पावसाामुळे ऊसतोडणीत अडथळे आल्याने तोडणी मंदावली. यामुळे अंदाजापेक्षा कमी उत्पादन झाले. सध्या मात्र तिथे तोडणीने गती घेतली आहे. ब्राझीलमध्ये उसाचे गाळप गेल्या वर्षीच्या तुलनेत 12 टक्क्यांनी वाढेल असाही अंदाज आहे.
साखरेला दर असल्याने यंदाही ब्राझीलचे कारखाने साखर निर्मितीला प्राधान्य देत आहेत. यंदाच्या हंगामापासून तेथील कारखान्यांनी गाळप क्षमताही वाढवली असल्याने साखरेचे उत्पादन गतीने होईल, असा अंदाज सद्यःस्थितीचा आहे.
निर्यातीचा आलेख खाली - 2022-23 मध्ये जगात साखरेचे उत्पादन 1770 लाख टन झाले होते. 2023-24 मध्ये 1830 लाख टन उत्पादन झाले होते. या साखर उत्पादनात ब्राझील व भारताचा वाटाच 50 टक्क्यांहून अधिक राहिला. 2021-22 मध्ये भारतातून विक्रमी 110 लाख टन साखर विविध देशांना पाठविण्यात आली. त्यानंतर आलेख झपाट्याने खाली आला. 2022-23 ला 60 लाख टन साखर भारतातून निर्यात झाली. 2023-24 ला निर्यातबंदी लादल्याने निर्यातीला चाप बसला.
देशातील साखर उत्पादनाबाबत संभ्रम - यंदा भारतात किती साखर उत्पादन होईल याबाबत संभ्रम आहे. या उद्योगातील अनेक संस्था कारखाना प्रतिनिधींची बैठक घेऊन अंदाज घेत आहेत. गेल्या वर्षीच्या सुरूवातीला साखर उत्पादन कमी होईल, असे संस्थांकडून सांगितल्याने केंद्राने निर्यात बंदीबरोबर इथेनॉल उत्पादनावरही मर्यादा आणल्या. याचा मोठा फटका साखर उद्योगाला बसला. यामुळे यंदा तोडणीसाठी असलेल्या उसाची काटेकोर माहिती, पावसाचा अंदाज घेऊनच या वर्षीच्या उत्पादनाबाबत केंद्र सरकारला संभाव्य उत्पादनाचे आकडे ठोस सांगण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे साखर उद्योगातील एका देश पातळीवरील संस्थेच्या प्रतिनिधींनी सांगितले. (अॅग्रोवन, 24.06.2024)