केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
नवी दिल्ली ः केंद्र सरकारने बुधवार दि. 21 फेब्रुवारी रोजी मोठी घोषणा केली असून त्यानुसार उसाच्या खरेदीदरात 8 टक्के वाढ केली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की,सरकारने शेतकर्यांना फायदा मिळावा यासाठी उसाच्या भावात प्रतिक्विंटल 25 रूपयांनी वाढ केली आहे. सध्या उसाची खरेदी किंमत 315 रूपये प्रति क्विंटल आहे. या निर्णयामुळे ती आता 340 रूपये होईल.
केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयाबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, मोदी सरकार शेतकर्यांसाठी काम करत आहे. या अंतर्गत दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. उसाचा खरेदी दर निश्चित करण्याचा पहिला निर्णय घेण्यात आला आहे. उसाची खरेदी किंमत म्हणजे एफआरपी 340 प्रतिक्विंटल करण्यात आली आहे. जी पूर्वी 315 प्रति क्विंटल होती.
शेतकरी आंदोलनात या घडामोडी घडत असतानाच मोदी सरकारने कॅबिनेटमध्ये शेतकर्यांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी माहिती देताना सांगितले की, मोदी सरकारने शेतकर्यांचे हित नेहमीच सर्वोच्च ठेवले आहे. प्रत्येक वेळी सरकारने शेतकर्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी पावले उचलली. ऊस खरेदीदरात 8 टक्के वाढ करण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने साखर हंगाम 2024-25 (ऑक्टोबर-सप्टेंबर) साठी साखर कारखानदारांनी देय असलेल्या उसाच्या वाजवी आणि लाभदायक किंमत म्हणजेच एफआरपीला मंजुरी दिली आहे. उसाची एफआरपी 315 रूपये प्रति क्विंटलवरून 340 रूपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे. म्हणजे उसाच्या भावात क्विंटलमागे 25 रूपयांची वाढ झाली आहे. (पुढारी, 22.02.2024)