केंद्र सरकारच्या एफआरपीनुसार प्रमाणित साखर उताऱ्यास २ हजार ५०५ रुपये भाव असताना विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने इतर उपपदार्थांच्या विक्रीतून झालेल्या नफ्यातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पाडव्यापूर्वी प्रति टन २ हजार ६०५ रुपये प्रमाणे ऊस बिलापोटी यापूर्वी दिले.
आणखी १०० रुपये देण्याचे कारखान्याचे चेअरमन दिलीपराव देशमुख यांनी जाहीर केले. त्यामुळे मांजरा साखर कारखान्याचा उसाचा अंतिम दर आता २ हजार ७०५ रुपये झाला आहे. कारखाना अधिमंडळाची ४० वी सर्वसाधारण सभा शनिवारी (ता. १४) शहरातील कातपूर रस्त्यावरील पार्वती मंगल कार्यालयात दिलीपराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली़.
यावेळी त्यांनी ही घोषणा केली़. आमदार अमित देशमुख, खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार धीरज देशमुख, साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील, श्रीपतराव काकडे, श्रीशैल उटगे आदी उपस्थित होते.
दिलीपराव देशमुख म्हणाले, की विलासराव देशमुख यांनी त्या काळात मांजरा कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक भाव दिला. तीच परंपरा आजही कायम सुरू आहे. मांजरा कारखान्याने नेहमीच नवनवीन प्रयोग केले.त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळाला.
यांत्रिकीकरण सुद्धा नवीन प्रयोग आहे. हार्वेस्टिंगचा प्रयोग केला. त्याला चांगले यश मिळाले. आता कारखान्याची क्षमता वाढविण्यात आली आहे़. त्याचाही फायदा शेतकऱ्यांना होणार आहे, असे नमूद केले.
कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना १६.६५ टक्के (दोन महिन्यांचा पगार) बोनस म्हणून जाहीर केला.आमदार अमित देशमुख म्हणाले, मांजरा कारखाना ही संस्था विलासराव देशमुख यांनी ४० वर्षांपूर्वी स्थापन केली. चार दशकांपासून आपण दरवर्षी एकत्र येतो. या कालावधीत कसलीही कुरबुर नाही. असे उदाहरण कोठेच नाही.
हे केवळ पारदर्शक कारभार आणि एकमेकांविषयीच्या विश्वासामुळे शक्य होते. मांजरा परिवाराने उसाला पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भापेक्षाही सर्वाधिक भाव दिला आहे. अनेकांनी साखर कारखाने काढले त्यांना हे जमले नाही, असे नमूद केले. तसेच राज्यातील महायुती सरकारवरही त्यांनी टीकास्त्र सोडले. सभेत खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार धीरज देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले.