anekant.news@gmail.com

9960806673

हंगामाच्या तोंडावर नको आंदोलनाचे हत्यार

साखर उद्योगाची अपेक्षा ः प्रशासन, नेते, कारखानदारांसह संघटनांनी आतापासूनच चर्चा करावी

कोल्हापूर ः यावर्षी जेमतेम पावसामुळे उसाचे पीक जोमात आहे. त्यामुळे उताराही चांगला पडेल, असा अंदाज आहे. पण हंगामाच्या तोंडावरच शेतकरी संघटना आंदोलनाचे हत्यार उपसतात आणि परिणामी हंगाम उशिरा सुरू होतो. यावर मार्ग काढण्यासाठी आतापासूनच प्रशासन, राजकीय नेते, कारखानदारांसह शेतकरी संघटनेेनेही चर्चेला सुरूवात करावी, अशी अपेक्षा साखर उद्योगातून व्यक्त होत आहे.
यावर्षी पहिल्या 10.25 उतार्‍याला 3400 रूपये प्रतिटन एफआरपी व त्यापुढील प्रत्येक एक टक्का रिकव्हरीला 320 रूपये दर निश्‍चित आहे. साखरेचे न वाढलेले दर तोडणी-ओढणीचा वाढलेला खर्च, प्रक्रिया खर्चात झालेली वाढ आणि साखरेवर सरकारचे असलेले नियंत्रण कारखानदारांची कोंडी करण्याचा प्रयत्न राहील. त्यातून हंगाम लांबेल, तर जवळचा कर्नाटकात ऊस जाण्याची भीती आहे.
यावर्षीचा हंगाम 15 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या घामाघुमीतच हंगाम सुरू होत आहे. ऊसतोडणी ओढणी यंत्रणा दिवाळी नंतरच येण्याची शक्यता आहे. कर्नाटकचा हंगामही 15 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. हंगाम वेळेत सुरू झाल्यास कारखानेही पूर्ण वेळ चालतील आणि कर्नाटकात जाणारा उसही रोखता येईल. यासाठी स्वाभिमानीसोबत दसर्‍यानंतर तरी चर्चा करण्याची गरज आहे.
हंगामाचे 120 ते 125 दिवस गृहित धरल्यास मार्चमध्ये हंगाम संपेल. पण आंदोलनामुळे तो लांबला तर वाढत्या उन्हामुळे तोडणी मजूर परतीच्या वाटेला लागण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पुढील पिके घेण्याचे शेतकर्‍यांचे नियोजनही बिघडते. वाढत्या उष्मामुळे उसाच्या वजनातही घट होण्याची शक्यता असते. याचा फटका अप्रत्यक्षरित्या शेतकर्‍यांना बसणार आहे.
यंत्रणा बसून राहिली तर त्यांच्या खावटीसह जनावरांच्या चार्‍याचाही प्रश्‍न गंभीर बनल्याचा यापूर्वीचा इतिहास आहेे. महाराष्ट्राबरोबर कर्नाटकाचा हंगाम सुरू होत असल्याने इथला हंगाम लांबला तर तोडणी यंत्रणा कर्नाटकात जाण्याची शक्यता तर आहेत, पण सीमाभागातील जिल्ह्यातील उसही तिकडे जाण्याची भीती आहे. या सर्व बाबींचा विचार आतापासूनच होण्याची गरज साखर उद्योगातून व्यक्त होत आहे.
दृष्टिक्षेपात जिल्ह्याचा हंगाम
* जिल्ह्यातील एकूण कारखाने 23
* कारखान्यांकडे नोंद क्षेत्र 187 लाख हेक्टर
* गाळपासाठी येणार ऊस 140 लाख मे.टन
* जिल्ह्यातील दैनंदिन गाळप क्षमता 1 लाख 37 हजार मे.टन
* हंगामाचा संभाव्य कालावधी 120 ते 125 दिवस (सकाळ, 29.09.2024)