कोल्हापूर :
ब्राझीलची साखर उत्पादनात घोडदौड सुरूच आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत जूनअखेर ब्राझीलच्या साखर उत्पादनात १५ टक्क्यांची वाढ झाली आहे. जूनअखेर ब्राझीलमध्ये १४० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. युनिका या संस्थेने ही माहिती दिली आहे. दुसरीकडे, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाही तेथे साखर उत्पादन वाढेल, अशी शक्यता साखर बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ब्राझीलचा साखर हंगाम एप्रिलला सुरू झाला.
ब्राझीलने सुरवातीपासूनच साखरेच्या उत्पादनात आघाडी घेतली. मे च्या पहिल्या पंधरवड्याचा अपवाद वगळता जूनमध्ये पुन्हा एकदा गतीने ऊस तोडणी व साखर उत्पादन झाले. गेल्या वर्षी या कालावधीत ४७ टक्के उसाचे गाळप झाले होते. यंदा हे प्रमाण ४९ टक्क्यांपर्यंत गेले आहे.
गेल्या वर्षी जूनमध्ये १६७० लाख टन उसाचे गाळप झाले होते. यंदा हे प्रमाण १८९० लाख टनांवर आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत गाळपाचे प्रमाण १३ टक्क्यांनी वाढले असल्याचे ‘युनिका’कडून स्पष्ट करण्यात आले आहे.
गेल्या वर्षीही ब्राझीलने साखर उत्पादनात निर्विवाद वर्चस्व राखले होते. अन्य देशांकडून जागतिक बाजारात साखरेची आवक न झाल्याने गेल्या वर्षभरामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर सातत्याने तेजीतच राहिले. याचा मोठा फायदा ब्राझीलमधील साखर कारखानदारांना झाला. जागतिक बाजारातून साखरेची मागणी वाढली असली तरी त्या तुलनेत ब्राझीलमध्ये जहाजेच उपलब्ध झाली नाहीत. अनेक दिवस ब्राझीलच्या बंदरांवर साखर जहाजांअभावी पडून असल्याचेही चित्र होते.
जगात अजूनही साखर हंगाम सुरू नसल्याने सध्या फक्त ब्राझीलची साखर जागतिक बाजारात येत असल्याचे चित्र आहे. यामुळे यंदाही ब्राझीलची साखर पुन्हा एकदा जागतिक बाजारात वर्चस्व गाजवेल, अशी शक्यता आहे. हे लक्षात येताच ब्राझीलमधील साखर कारखान्यांनी इथेनॉल पेक्षा साखर उत्पादनावरच अधिक भर दिल्याचे दिसून येत आहे.
‘कोनाब’ या अन्य एका संस्थेने दिलेल्या माहितीनुसार ब्राझीलमध्ये यंदा साखरेचे उच्चांकी उत्पादन होण्याची शक्यता आहे. यंदा तेथील साखरेचे उत्पादन ४६० लाख टनांवर जाईल, अशी शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत उसाचे उत्पादनही ९ टक्क्यांपर्यंत वाढल्याने साखरेचे उत्पादन वाढेल, असे ‘कोनाब’ने सांगितले आहे.
भारत, थायलंडचे अस्पष्ट धोरण भारतासारख्या साखर उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या देशाने अजूनही निर्यातीबाबत आपले स्पष्ट धोरण जाहीर केलेले नाही. तिसऱ्या क्रमांकावरील थायलंडने ही त्यांच्या साखर धोरणाबाबत भाष्य केलेले नाही. तिथे ही यंदा उष्णतेने उच्चांक गाठला आहे. याचा फटका ऊस उत्पादनाला बसत आहे. यामुळे या देशाकडून जगाला साखरपुरवठा होईल की नाही याबाबत साशंकता आहे.
...तर साखर दरवाढीची शक्यता
ब्राझीलमध्ये साखर उत्पादन वाढल्याने जागतिक बाजारात साखरेच्या किमती गेल्या दोन आठवड्याच्या तुलनेत कमी झाल्या आहेत. अर्थात ही मोठी घसरण नाही. येत्या काही महिन्यात इतर देशांकडून साखर जागतिक बाजारात आली नाही तर दरात वाढ होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.