इंदापूर । देशाचे गृह व सहकार मंत्री अमित शाह यांची राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष व माजी मंत्री, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी नवी दिल्ली येथे सोमवारी (दि. 24) भेट घेतली. याभेटीमध्ये देशातील साखर उद्योगाच्या विविध मागण्यां संदर्भात चर्चा झाली. तसेच यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी अमित शाह यांचे देशाच्या सहकार मंत्रीपदी दुसऱ्यांदा विराजमान झालेबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा व्यक्त केल्या.
याभेटीत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी उसाच्या देय एफ.आर.पी. मध्ये प्रत्येक वर्षी वाढ होत असून, सन 2019 पासून साखरेच्या किमान विक्री दरामध्ये (एम.एस.पी.) वाढ झालेली नाही. परिणामी, देशातील साखर उद्योगापुढे आर्थिक अडचणी वाढत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने साखरेचा किमान विक्री दर प्रति क्विंटल रु. 4200 करावा, अशी विनंती अमित शाह यांचेकडे केली.
या संदर्भातील साखर उत्पादन खर्चाच्या वस्तुनिष्ठ आकडेवाडीसह प्रस्तावाची हर्षवर्धन पाटील यांनी अमित शाह यांना माहिती दिली. तसेच देशातील साखर उद्योगाच्या सद्यःस्थितीची, आगामी गळीत हंगामातील संभाव्य साखर उत्पादन, इथेनॉल उत्पादन याची माहितीही अमित शाह यांना हर्षवर्धन पाटील यांनी दिली. दरम्यान, यावेळी केंद्र सरकार लवकरच राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने दिलेल्या साखरेच्या एमएसपी वाढीच्या प्रस्तावावरती सकारात्मक निर्णय घेईल, असे अमित शाह यांनी स्पष्ट केले. यावेळी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे उपस्थित होते.
नवी दिल्लीत हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक नवी दिल्ली येथे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या संचालक मंडळाची बैठक महासंघाच्या कार्यालयामध्ये सोमवारी (दि.24) संपन्न झाली. यावेळी देशातील झालेले साखर उत्पादन व इथेनॉल निर्मितीची सद्यस्थिती व आगामी ऊस गळीत हंगामा तसेच साखरेची एम.एस.पी. वाढ आदी विषयां संदर्भात सविस्तर आढावा घेण्यात आला.