6 कारखान्यांवर वसुली कारवाई, 10 कारखान्यांना वसुलीसाठी पत्रे
राशिवडे ः 2023-24 चा ऊस गळीत हंगाम संपून बराच कालावधी लोटला असतानाही राज्यातील सुमारे 37 साखर कारखान्यांकडून 276 कोटींची एफआरपी थकीत आहे. त्यामुळे संबंधित कारखान्यांवर साखर आयुक्त कार्यालयाकडून जिल्हाधिकार्यांकडे महसूल प्रमाणपत्र वसुलीची पत्रेही पाठविली असून याआधीच 6 कारखान्यांवर कारवाईही करण्यात आली आहे.
चालू हंगामात 208 सहकारी व खासगी कारखान्यांकडून 1076 लाख टन उसाचे गाळप करण्यात आले. गाळप उसाची एफआरपी रक्कम तोडणी ओढणी कपात करून 27,513 कोटी होते. परंतु 171 कारखान्यांनीच फक्त पूर्ण एफआरपी अदा केली आहे. तर 32 कारखान्यांनी 99 टक्के 4 कारखान्यांनी 80 टक्के तर एका कारखान्याने 60 टक्के एफआरपी अदा केली आहे. अदा करण्याची टक्केवारी 99.25 आहे. 37 कारखान्यांनी अर्धवट ऊस बिले दिली आहे. त्यामुळे 276 कोटींची एफआरपी थकीत आहे.
सहा कारखान्यांवर एफआरपी अदा न केल्यामुळे महसूल प्रमाणात वसुलीची कारवाई झाली आहे. तर 10 कारखान्यांना संधी देऊनही रक्कम न अदा केल्यामुळे साखर आयुक्तांकडून जिल्हाधिकार्यांकडे महसूल प्रमाणात वसुलीसाठीची पत्रे पाठविली आहेत. प्रामुख्याने गतहंगाम संपून नव्या हंगामासाठी कारखान्यांकडून तयारी पूर्ण होत असताना थकलेली एफआरपी संबंधित कारखान्यांची आर्थिक परिस्थितीची जाणीवच करून देत आहे. राज्यातील कित्येक सहकारी साखर कारखान्यांनी आर्थिक उलाढालीची कसरत करत एफआरपी अदा केली आहे. त्यामुळे नव्या हंगामासाठीही आर्थिक कसरत करावी लागणार आहे. एफआरपी अदा न केलेल्या कारखान्यांवर मात्र कारवाई करण्यात आल्याने नवा हंगाम या कारखान्यांना आव्हान ठरणार आहे. (पुढारी, 20.07.2024)