anekant.news@gmail.com

9960806673

भारत-ब्राझीलमधील साखर उद्योगाचा गोडवा वाढला

भारतीय साखर उद्योगाच्या मूल्यसाखळीला बळकट करण्यास ब्राझीलची मदत घेतली जाणार आहे. त्यासाठी केंद्रीय सचिवांच्या नेतृत्वाखाली साखर उद्योगाचे एक शिष्टमंडळ पुढील महिन्यात ब्राझीलमध्ये जात आहे.केंद्रीय वाणिज्य व्यापार व अन्न मंत्रालयाचे सचिव संजीव चोप्रा यांच्या नेतृत्वाखाली ६ ते ११ ऑक्टोबर दरम्यान होत असलेल्या ब्राझील दौऱ्यात इंडियन शुगर मिल्स अॅण्ड बायोफ्युएल्स असोसिएशन (इस्मा) सहभाग महत्त्वाचा असेल. भारतीय तेल विपणन कंपन्या व साखर मूल्य साखळीतील विविध उद्योगांचे प्रतिनिधी या दौऱ्यात सहभागी होत आहेत. ब्राझीलमधील उद्योगांना भेटी, धोरणात्मक चर्चा तसेच दोन्ही देशांमधील सरकारी अधिकाऱ्यांमध्ये माहितीचे आदानप्रदान अशी उद्दिष्टे या दौऱ्याची आहेत.

शाश्‍वत जैवइंधन निर्मितीच्या जागतिक बाजारात भारत व ब्राझील असे दोन्ही देश झपाट्याने पुढे येत आहेत. प्रगत देशांनी स्थापन केलेल्या जागतिक जैवइंधन आघाडीत (जीबीए) भारताची भूमिका मोलाची आहे. साखर उद्योग मूल्यसाखळीला बळकट करण्यासाठी ‘इस्मा’ने ब्राझीलियन शुगर अॅण्ड बायोरिफायनरी असोसिएशनसोबत काम करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी ब्राझीलमधील साखर मूल्य साखळीतील इतर मातब्बर घटकांची मदत घेतली जाणार आहे. इंडो-ब्राझीलची मोळी घट्ट होण्यासाठीच तेथील उद्योगांना भेटी देत धोरणात्मक चर्चा करण्याची तयारी केंद्र शासनाने सुरू केली आहे.

विशेषतः ब्राझीलमधील साखर आधारित इथेनॉल रिफायनरींना होणाऱ्या भेटी या दौऱ्यात मोलाच्या ठरणार आहेत. गेल्या हंगामात ब्राझीलने ८.२६ अब्ज गॅलन इथेनॉलची निर्मिती केली होती. भारताने देखील २०१९ मधील १.७३ अब्ज लिटरवरून इथेनॉल निर्मिती वाढवून गेल्या हंगामात पाच अब्ज लिटरपर्यंत नेली आहे.

इथेनॉलसह हायड्रस इथेनॉल, शाश्‍वत हवाई इंधन, हरित हायड्रोजन, जैवप्लास्टिक अशा विविध क्षेत्रांत भारतीय साखर उद्योग ब्राझीलसोबत काम करण्यास इच्छुक आहे. पूर्वी जगाच्या साखर उत्पादनातील सर्वांत बलाढ्य असलेल्या ब्राझीलसमोर भारतीय साखर उद्योगाने मोठे आव्हान उभे केले आहे. २०२२ च्या हंगामात ब्राझीलने ३६३ लाख टन साखर तयार केली. तर भारताने याच वर्षात ३२८ लाख टन साखर निर्मिती केली. साखर निर्यातीत मात्र ब्राझील आघाडीवर आहे. गेल्या हंगामात ब्राझीलने २८२ लाख टन साखरेची निर्यात केली. त्या तुलनेने भारतीय साखर निर्यात केवळ ७७ लाख टनांवर स्थिरावली होती.