मागणीच्या तुलनेत २३ लाख टनांचा अपुरा कोटा घोषित
पुणे ः केंद्र सरकारने मार्च महिन्यासाठी २३ लाख टन साखरेचा कोटा खुला केला आहे. उन्हाळ्यामुळे साखरेचा खप हा पुढील दोन महिने वाढता राहणार आहे. शिवाय लग्नसराई, यात्रा जत्रा आणि थंडपेय उत्पादकांची वाढणारी मागणी लक्षात घेता घोषित कोटा मागणीच्या तुलनेत अपुरा असल्यामुळे साखरेचे दर तेजीत राहण्याचा अंदाज घाऊक बाजारपेठेतून वर्तविण्यात आला.
फेब्रुवारी महिन्यातील शिल्लक साखर विक्रीला केंद्राने मुदतवाढ दिलेली नाही. मार्च महिन्यासाठी किमान २४ लाख टनांचा कोटा जाहीर होण्याची अपेक्षा बाजारपेठेला होती. मात्र अपेक्षेपेक्षा कमी कोटा घोषित करण्यात आल्याने बाजाराची मनोवृत्ती तेजीकडे झुकल्याचे सांगण्यात आले. उन्हाळ्याला सुरूवात झालेली आहे. त्यातच लग्नसराई यात्रा जत्रा आणि थंडपेय उत्पादकांकडून नेहमीच्या तुलनेत अधिक खपाचे दिवस असल्याने अपेक्षित मागणीनुंसार मुबलक कोटा देणे अपेक्षित होते. (पुढारी, २८.०२.२०२५)