anekant.news@gmail.com

9960806673

विखे’, ‘थोरात’ची राजकीय धुराडीही पेटली

विधानसभा निवडणुकीनंतर आता प्रथमच विखे-थोरातांचा सहकारातील सत्तासंघर्षही राज्याला पाहायला मिळणार आहे. विखे पाटलांचा ‘प्रवरा’, थोरातांचा ‘संगमनेर’ आणि राहुरीचा ‘तनपुरे’ अशा तीन कारखान्यांच्या निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रशासनाने विखे-थोरात कारखान्यांच्या सभासद असलेल्या संस्थांची यादी मागवली आहे, तर ‘तनपुरे’चीही ही प्रक्रिया आठवडाभरात सुरू होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, या तिन्ही कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात विखे आणि थोरातांची मोठी ताकद असल्याने या निवडणुकांकडे राज्याचे लक्ष असणार आहे.

आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना असलेल्या पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याची फेब्रुवारी 2020 मध्ये बिनविरोध निवडणूक झाली होती. सलग तिसर्‍यांदा ही निवडणूक बिनविरोध झाली होती. विखे गटाकडून 37 तर विरोधी गटाकडून केवळ दोन अर्ज दाखल होते. विरोधकांचे दोन्ही अर्ज छाननीत बाद झाले होते. तर, त्याच कालावधीत सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचीही निवडणूक लागली होती. येथे 21 जागांसाठी 382 अर्ज दाखल झाले होते. यात विखे गटाचा जयश्री शिंदे यांचा एकमेव अर्ज शेवटपर्यंत्त राहिला होता. मात्र त्यानंतर अर्ज माघारी झाल्याने ही निवडणूकही बिनविरोध झाली होती. शेवटच्या दिवशी विकास मंडळाच्या सर्व विरोधकांनी माघार घेतली होती.

दुसरीकडे राहुरीचा डॉ. तनपुरे कारखान्याची निवडणूक 2017 मध्येच झाली होती. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन मंडळाने ही निवडणूक जिंकली होती. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या गटाचे शिवाजीराजे गाडे, अशोक खुरूद हे दोन सदस्य निवडून आले होते. बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांचा धक्कादायक पराभव झाला होता. त्यानंतर दोन वर्षांपासून कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत संपलेली आहे. मात्र निवडणूक लागलेली नाही. सध्या कारखान्यावर प्रशासक आहे. तत्पूर्वी व्यवस्थापनाने निवडणुकीसाठीची आवश्यक 32 लाखांची रक्कम भरली आहे. त्यामुळे निवडणुकीचा मार्ग मोकळा झालेला आहे.

लवकरच ‘त्या’ सभासद संस्थांचे ठराव मागविणार!प्रादेशिक साखर सहसंचालक विभागाकडून निवडणुकीच्या हालचाली सुरू आहेत. विखे व थोरात कारखान्याच्या व्यवस्थापनाला सभासद असलेल्या संस्थांची यादी पाठविण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे कारखान्याच्या निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज झाल्याचे दिसते आहे. दरम्यान, ही यादी प्राप्त झाल्यानंतर संंबंधित संस्थांचे ठराव घेऊन ते नगरला पाठविण्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. तनपुरे कारखान्याबाबतही आठवडाभरात हालचाली वाढतील, असे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.