प्रादेशिक सहसंचालक (साखर) नांदेड कार्यालयांतर्गत नांदेड विभागातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सध्या आटोपतीकडे चालला आहे.
विभागातील दोन कारखान्यांचा पट्टा पडला आहे.आजपर्यंत या कारखान्यांनी ७३ लाख ९४ हजार ८७९ टन उसाचे गाळप तर ६८ लाख ९२ हजार ६०४ क्विंटल साखरेचे उत्पादन केल्याची माहिती प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाने दिली.
प्रादेशिक सहसंचालक (साखर) नांदेड विभागातील नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्यातून गाळप हंगाम २०२४-२५ साठी २९ कारखान्यांनी गाळप सुरु केले. यात १९ खासगी तर १० सहकारी साखर करण्याचा समावेश होता. यंदा हंगामाची सुरवात ता. १५ नोव्हेंबरपासून झाली.
यात परभणी जिल्ह्यात सात खासगी, हिंगोली जिल्ह्यात दोन खासगी व तीन सहकारी, नांदेड जिल्ह्यात पाच खासगी व एक सहकारी तसेच लातूर जिल्ह्यातील पाच खासगी व सहा सहकारी कारखान्यांचा समावेश आहे. सध्या उन्हाचा चटका जाणवत आहे. तसा कारखान्यांचे गाळपही कमी होत आहे.यामुळे विभागाचा गाळप हंगाम आटोपतीकडे चालला आहे. यात लातूरमधील विकासरत्न विलासराव देशमुख सहकारी साखर कारखाना लातूर व शेतकरी सहकारी साखर कारखाना किल्लारी (ओसा) या दोन कारखान्याचा समावेश आहे.
आजपर्यंत या कारखान्यांनी ७३ लाख ९४ हजार ८७९ टन उसाचे गाळप तर ६८ लाख ९२ हजार ६०४ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. विभागाचा सरासरी साखर उतारा ९.३२ टक्के असल्याची माहिती मिळाली.
ट्वेंटीवन शुगर्सची गंगाखेडवर मात
परभणीतील गंगाखेड शुगर ॲण्ड एनर्जी लि. हा खासगी साखर कारखाना मागील काही वर्षापासून गाळपात अग्रेसर राहतो. परंतु यंदा मात्र ट्वेंटीवन शुगर्स या कारखान्याने आजपर्यंत पाच लाख ६९ हजार टन गाळप करून विभागामध्ये आघाडी घेतली आहे. तर दुसऱ्या स्थानी ट्वेंटीवन शुगर्स माळवटी लातूर या कारखान्याने पाच लाख १५ हजार टन उसाचे गाळप केले आहे. तर तिसऱ्या स्थानावर असलेल्या गंगाखेड शुगर्स या कारखान्याने चार लाख ९३ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.