anekant.news@gmail.com

9960806673

डॉ. तनपुरे : भाडे कराराबाबत चौकशी वाढल्याने निविदा प्रक्रियेस पाच दिवसांची मुदतवाढ

आता 12 जुलैपर्यंत निविदा घेता येणार

अहमदनगर :

डॉ. बी. बी. तनपुरे साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यास देण्यासाठी जिल्हा बँकेने चौथ्यांदा निविदा काढली. यात 27 जून ते 6 जुलैदरम्यान निविदा घेवून जाण्यास मुदत होती. या कालावधीत पुणे आणि बीड जिल्ह्यातून दोघांनी तनपुरे कारखाना भाडे करारावर चालवण्यात रस दाखवत निविदा नेल्या होत्या. मात्र, निविदा घेण्याची मुदत संपण्याच्या अखेरच्या दिवशी राज्यातील अन्य शुगर संस्थांनी तनपुरे कारखान्यांत रस दाखवत बँकेकडे चौकशी केली. तसेच कारखान्यांसाठी निविदा वाढव्यात यासाठी बँकेच्यावतीने निविदा प्रक्रियेला पाच दिवसांची मुदतवाढ दिली आहे. यामुळे आता कारखान्यांसाठी 12 जुलैपर्यंत निविदा घेवून जाता येणार आहेत.

दरम्यान, मागील आठवड्यात पुण्याच्या भुलेश्वर शुगर आणि बीडच्या मोहटादेवी शुगर यांनी डॉ. तनपुरे साखर कारखान्यांत रस दाखवत निविदा नेेलेल्या आहेत. तसेच 6 ते 8 जुलैपर्यंत कारखान्यांच्या मालमत्ता पाहणी कार्यक्रम आखण्यात आला होता. मात्र, निविदा घेवून जाण्याच्या शेवटच्या दिवशी राज्यातील काही साखर संस्थांकडून कारखान्यांबाबत बँकेकडे विचारणा केली. या कारखान्यांसाठी आधी तीन वेळा निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती. मात्र, त्यात यश न आल्याने चौथ्यांदा निविदा प्रक्रिया राबवण्याची वेळ बँकेवर आली होती. मात्र, यावेळी आधी दोघे आणि नंतर काही संस्थांनी शेवटच्या दिवशी रस दाखवल्याने कारखाना भाड करारावर देतांना स्पर्धा व्हावी, यासाठी बँकेने आताच्या निविदा प्रक्रियेला पाच दिवसांची मुदत वाढ दिली आहे. यामुळे आता कारखान्यांत रस असणार्‍यांना 12 जुलैपर्यंत निविदा नेता येणार असून आधीचा निविदा प्रक्रियेचा संपूर्ण कार्यक्रम पाच दिवसांनी पुढ जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

राहुरीच्या डॉ. तनपुरे साखर कारखान्यांच्या 134 कोटी रुपयांच्या वसूलीसाठी यापूर्वी जिल्हा बँकेने तिनवेळा प्रसिद्ध केल्या होत्या. मात्र, अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने आता बँकेच्या संचालक मंडळाच्या निर्णयानूसार चौर्थ्यांदा फेरनिविदा काढण्यात आली. राहुरी तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकर्‍यांची कामधेनू असणार्‍या डॉ. तनपुरे साखर कारखाना चालावा, यासाठी काही वर्षापूर्वी जिल्हा बँकेने कारखान्यांला 90 कोटी 3 लाख रुपयांचे कर्ज दिले होते. त्या कर्जावर आता 44 कोटी 93 लाख रुपयांचे व्याज झाले असून यामुळे दोन वर्षापूर्वी जिल्हा बँकेने हा कारखाना ताब्यात घेवून तो भाडेतत्वार चालवण्याचा निर्णय घेतला. यासाठी सलग तिनवेळा निविदा प्रसिद्ध होऊनही त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे चौर्थ्यांदा निविदा काढल्यानंतरही दोघांनी निविदा नेल्या असून यामुळे आता या निविदा प्रक्रियेला पाच दिवसांची मुदत वाढ देण्यात आलेली आहे.

दरम्यान, जिल्हा बँकेच्या थकीत कर्जाच्या रक्कमेच्या वसूलीसाठी दरवर्षी 17 कोटी 25 लाख रुपयांचे भाडे आकारण्याचा निर्णय घेतला आहे. कारखान्यांकडे मिल आणि डिस्टीलरी प्रकल्प असून गाळप क्षमता 4 हजार 250 प्रतिदिन आहे. हा कारखाना भाडेकरारावर चालल्यास बँकेने दिल्या कर्जाची वसूली होणार आहे. यासाठी राज्यातील जास्ती जास्त कारखान्यांनी या कारखान्यांच्या निविदा प्रक्रियेत सहभागी व्हावे, अशी बँकेच्या संचालक मंडळाची इच्छा आहे.