140 कारखान्यांची धुराडी बंद, 67 कारखाने सुरूच
ऊस गाळप, साखर उत्पादन, उतार्यात कोल्हापूर अग्रस्थानी
पुणे ः राज्यातील 140 साखर कारखान्यांची धुराडी कार्यक्षेत्रातील ऊस संपल्यामुळे बंद झाली असून, अद्यापही 67 कारखाने सुरू आहेत. सद्यःस्थितीत 10 कोटी 49 लाख टन उसाचे गाळप पूर्ण होऊन 10.23 टक्के सरासरी उतार्यानुसार 107.31 लाख टन साखरेचे उत्पादन हाती आले आहे. दरम्यान, कोल्हापूर विभागाने ऊस गाळप, साखर उत्पादन आणि उतार्यातील अव्वल स्थान कायम ठेवले आहे.
कोल्हापूर विभागाने 239.5 लाख टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे, तर सर्वाधिक 11.55 टक्के उतार्यानुसार 276.7 लाख क्विंटल इतके साखर उत्पादन तयार केले आहे. या विभागातील 40 पैकी 26 कारखाने बंद झाले आहेत. दुसर्या क्रमांकावर पुणे विभाग असून येथील कारखान्यांनी 231.8 लाख टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. 10.46 टक्के उतार्यानुसार 242.23 लाख क्विंटल इतके साखर उत्पादन तयार केले आहे.
सोलापूर विभागात 213.87 लाख टन उसाचे गाळप पूणर्र् झाले आहे. सर्वाधिक 50 कारखाने सोलापूर विभागात असून येथील 43 कारखाने बंद झाले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात 136.86 लाख टन, छत्रपती संभाजीनगर विभागाने 96.84 लाख टन, नांदेड विभागात 116.88 लाख टन गाळप पूर्ण झाले आहे. (पुढारी, 02.04.2024)