anekant.news@gmail.com

9960806673

साखर उत्पादनात महाराष्ट्र पिछाडीवर


उत्तर प्रदेशची आघाडी, देशात २४७ लाख टन साखर निर्मिती
सोमेश्वरनगर ः देशात सलग ३ वर्षे साखर उत्पादनात आघाडीवर असलेला महाराष्ट्र चालू हंगामात मात्र पिछाडीवर पडला आहे. उत्तर प्रदेशमध्ये ८७ लाख टन साखर निर्मिती झाली आहे. तेथे अद्यापही ४८ कारखाने सुरू आहेत. दुसरीकडे महाराष्ट्राचा साखर हंगाम संपल्यात जमा असूून, केवळ ८० लाख टठन साखर निर्मिती झाली आहे.
इंडियन शुगर मिल असोसिएशन आणि राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने मार्चअखेरचा साखर उद्योगाचा आढावा जाहीर केला आहे. देशात आतापर्यंत २४७ लाख टन साखर निर्मिती झाली असून हंगामअखेर एकूण २६४ लाख टनांवरच साखर निर्मितीचे गाडे अडणार असल्याचा सुधारित अंदाज व्यक्त केला आहे.
गत हंगामात ३१९ लाख टन साखर निर्मिती झाली होती. चालू हंगामात साखर निर्मिती ५४ ते ५५ लाख टन घट झाली असून, त्याचे प्रमुख कारण महाराष्ट्र आहे. साखर निर्मितीत महाराष्ट्रात ३० लाख टन, उत्तर प्रदेशात ९.५ लाख टन तर कर्नाटकात १० लाख टन इतकी घट दिसून येत आहे.
मागील २०२३-२४ हंगामात महाराष्ट्रात ११० लाख टन तर उत्तर प्रदेशमध्ये १०४ लाख टन, तर २०२२-२३ मध्ये महाराष्ट्रात १०५ लाख टन तर उत्तर प्रदेशमध्ये १०४ लाख टन (खांडसरी वगळून) साखर निर्मिती झाली होती. तसेच २०२१-२२ मध्ये महाराष्ट्रात १३८ लाख टन तर उत्तर प्रदेशमध्ये १०२ लाख टन साखर निर्मिती झाली होती. तत्पूर्वी २०१६-१७ ते २०२०-२१ या चारही हंगामात उत्तरप्रदेशने अधिराज्य गाजविले होते. २०१५-१६ पर्यंत मात्र महाराष्ट्राचेच वर्चस्व अबाधित होते.
* आता पुन्हा एकदा उत्तर प्रदेशचे कारखाने कमी असतानाही महाराष्ट्राची मक्तेदारी मोडीत काढली आहे. मार्चअखेर उत्तर प्रदेशमधील १२२ पैकी ४८ कारखाने चालू असून ८७ लाख टन साखर निर्मिती झाली आहे. तर महाराष्ट्रात २०० पैकी केवळ ६ कारखान्यांची धुगधुुगी सुरू असून ८० लाख टन साखर निर्मिती झाली आहे. महाराष्ट्राला साखर निर्मितीत मागे पडल्याचा फार मोठा आर्थिक फटका बसणार आहे. (सकाळ, ०९.०४.२०२५)