anekant.news@gmail.com

9960806673

ऊस शेतीमधील एआरसाठी होणार त्रिपक्षीय करार

व्हीएसआयच्या कृतीगटाच्या पहिल्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
पुणे ः राज्याच्या ऊस शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्राच्या वेगाने विस्तार करण्यासाठी त्रिपक्षीय करार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय वसंतदादा शुगर इन्सिटट्यूटच्या (व्हिएसआयच्या) कृतिगटाच्या बैठकीत घेण्यात आला. व्हीएसआयच्या नियामक मंडळाच्या झालेल्या बैठकीत अध्यक्ष शरद पवार यांनी एआय तंत्राचा विस्तार करण्याची सूचना केली होती. त्यांनी याबाबत राज्याचे माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व्हीएसआयचा एक कृतिगटदेखील स्थापन केला होता. या गटाची पहिली बैठक दि. ५ एप्रिल रोजी झाली
तीन घटक एकत्र येणार - एआय तंत्रज्ञानाची यशस्वी जुळणी एडीटीने केली आहे. तर व्हीएसआयमध्ये प्रशिक्षण देण्याची क्षमता आहे. तसेच राज्यातील साखर कारखाने क्षेत्रिय पातळीवर थेट शेतकर्‍यांसोबत काम करीत आहेत. त्यामुळे या तीनही घटकांनी एकत्र यावे. त्यासाठी त्रिपक्षीय करार करावा व त्यातून आपापली जबाबदारी निश्चित करून एआय तंत्रज्ञानाचा विस्तार करावा, असा निर्णय कृतिगटाच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला. त्रिपक्षीय कराराचा मसुदा निश्चित करण्यासाठी गटाची लवकरच दुसरी बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले.
यावेळी जयंत पाटील म्हणाले, की ऊस शेतीमधील या नवतंत्राला गती देण्यासाठी व्हीएसआय व साखर कारखान्यांची भूमिका अधिक महत्त्वाची आहे. बारामतीमध्ये केव्हीकेच्या प्रक्षेत्रात विकसित केलेले तंत्रज्ञान शेतकर्‍यांपर्यंत जलदगतीने पोहोचविण्यासाठी व्हीएसआयच्या प्रशिक्षण प्रणालीचा अनुभव उपयुक्त ठरणार आहे. कारखान्यांच्या संबंध थेट शेतकर्‍यांशी असल्यामुळे त्यांची सोबत या प्रकल्पाचा विस्तारात मोलाची ठरेल. (अ‍ॅग्रोवन, ०७.०४.२०२५)