मसूर : सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याकडे गळितास येणार्या उसाला 3204 रुपये पहिला हप्ता व कारखान्यास पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर 1 एप्रिल 2025 पासून सभासद शेतकर्यांना त्यांची साखर गावपोच मोफत देणार असल्याची घोषणा माजी सहकार व पणन मंत्री तसेच सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी केली. नेहमीच ऊस दरात अग्रेसर असणार्या आणि राज्याला आदर्श ठरणार्या सह्याद्रीच्या या निर्णयाचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.यशवंतनगर (ता. कराड) येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या सन 2024-25 या गळीत हंगामामध्ये उत्पादित झालेल्या तीन लाखांवरील पहिल्या पाच साखर पोत्यांचे पूजन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी कारखान्याच्या व्हा. चेअरमन सौ.लक्ष्मीताई गायकवाड, राज्य लेखा परिषदेचे माजी अध्यक्ष शहाजी क्षीरसागर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, माजी शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, सह्याद्रीचे संचालक युवा नेते जशराज पाटील, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या शरदचंद्र पवार पार्टीच्या सौ. संगीता साळुंखे, पं.स.चे माजी सभापती प्रणव ताटे, कराड उत्तर अध्यक्ष देवराजदादा पाटील, सह्याद्रिचे संचालक माणिकराव पाटील, पांडुरंग चव्हाण, पै.संजय थोरात, लालासाहेब पाटील, तानाजीराव जाधव आदींसह कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद, ऊस तोडणी-वाहतूक कंत्राटदार, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.साखरेची एसएमपी वाढणे गरजेचे असून केंद्र सरकारचे त्यास सहकार्य असणे अपेक्षित असल्याचे सांगून बाळासाहेब पाटील म्हणाले, कारखान्याच्या दोन्ही प्लांटचे गळीत पूर्ण क्षमतेने सुरू असून 15 लाख मे.टन वर्षात गळीत होईल. सभासद संख्या 60 हजार वरून 75 हजार पर्यंत न्यायची असून त्यासाठी ज्यांचा ऊस सातत्याने कारखान्याकडे येईल त्यांना सभासद करून घेण्यात येईल. तसेच मयताच्या वारसदारांनी शेअर्स ट्रान्सफर करण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करावी.
प्रास्ताविक कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी केले. सूत्रसंचालन आर.जी. तांबे यांनी केले. ज्येष्ठ संचालक मानसिंगराव जगदाळे यांनी आभार मानले.