तुळजापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार, महाराष्ट्र राज्य साखर महासंघाचे माजी अध्यक्ष नरेंद्र बोरगावकर यांचे दीर्घ आजाराने ( वय ८६ ) उपचारादरम्यान पुणे येथे निधन झाले. माजी आमदार बोरगावकर हे 1994 ते 1996 या कार्यकाळात स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघामधून विजयी झाले होते. तत्पूर्वी 1962 मध्ये स्थापन झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी सर्वप्रथम माळुंब्रा जिल्हा परिषद मतदार संघामधून निवडणूक लढवली. त्यानंतर त्यांनी जळकोट जिल्हा परिषद मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. तकलीन काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी 1974 साली उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून कामकाज पाहिले.
शिक्षण क्षेत्रात उल्लेखनिय कार्य1949 साली त्यांनी अपसिंगा येथे नरेंद्र आर्य शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. तेथे वस्तीगृह व शाळा सुरू केली. 1970 मध्ये नळदुर्ग येथे बालाघाट शिक्षण संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे ते संस्थापक सचिव आहेत. त्यानंतर कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग व यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तुळजापूर या दोन महाविद्यालयाची सुरुवात केली. 1989 मध्ये तुळजापूर येथे जीवन विकास शिक्षण मंडळाची स्थापना करून जिजामाता कन्या प्रशाला आणि इतर 9 शाळांची उभारणी केली.
सर्वसामान्यांसाठी लढा देणार नेता म्हणून ओळखबोरगावकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन होण्यापूर्वी काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय काम केले. प्रदेश उपाध्यक्ष पदावर ते काम करत होते. सर्वप्रथम त्यांनी जिल्हा अध्यक्ष काँग्रेस पार्टी या पदावरून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. कार्यकर्त्याला बळ देणारा नेता आणि सर्वसामान्य माणसाच्या कामासाठी अखेरपर्यंत लढा देणारा नेता अशी त्यांची जिल्ह्यामध्ये ओळख राहिली आहे. त्यांच्या पक्षात एक मुलगा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष उल्हास बोरगावकर , दोन मुली नातवंडे असा मोठा परिवार आहे. रविवारी (दि. २०) आपसिंगा रोडवरील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आहे. यावेळी नागरिक, कार्यकर्ते, समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.