फेब्रुवारीत विविध देशांत तब्बल 30 लाख टन निर्यात
कोल्हापूर ः ब्राझीलने साखर निर्यातीत घोडदौड सुरूच ठेवली आहे. यंदा फेब्रुवारीमध्ये तब्बल 30 लाख टन साखरेची निर्यात विविध देशांना केली आहे. गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत ही निर्यात तिप्पट आहे. फेब्रुवारी 2023 च्या तुलनेत यंदा फेब्रुवारीत निर्यात 162 टक्क्यांनी वाढली आहे. ब्राझीलने गेल्या हंगामात 400 लाख टनांचा साखर उत्पादनाचा टप्पा ओलांडला. एकूण निर्यातही 300 लाख टनांच्या आसपास आली आहे. ब्राझीलने साखर उत्पादन व निर्यातीत जगातील सर्वच देशांना मागे टाकत अग्रस्थान पटकावले आहे.
भारताला जादा दर मिळविण्याची संधी असूनही केंद्र सरकारने साखर निर्यातीवर बंदी आणली. याचा फायदा ब्राझीलला झाला. भारताचे खरेदीदार देशही ब्राझीलने परत आपल्याकडे वळविल्याने जागतिक बाजारात भारतीय साखरेचा वरचष्मा संपला आहे. ब्राझील वगळता अन्य कोणत्याच देशात निर्याती इतपत साखरेचे उत्पादन झाले नाही. भारतासारख्या देशांनी उत्पादित साखरेसाठी स्थानिक बाजारपेठेला प्राधान्य दिल्याने भारतीय साखर आंतरराष्ट्रीय बाजारात जाऊ शकली नाही. याचा फायदा ब्राझीलने उठविल्याचे या हंगामात दिसले.
दोन वर्षांपूर्वी ब्राझीलमध्ये मोठा दुष्काळ पडला. याचा नकारात्माक परिणाम या देशाला सहन करावा लागला. भारताने मुक्त हस्ते निर्यातीला परवानगी दिली. आंतरराष्ट्रीय बाजारात दोन वर्षांपूर्वी पहिल्यांदाच स्थानिक बाजारापेक्षा जादा दर मिळाले याचा फायदा भारतीय साखर उद्योगाला झाला. 2 वर्षांपूर्वी 100 लाख टनांहून अधिक साखर भारताबाहेर गेली. पण यानंतर कमी उत्पादनाचा दाखला देत भारतातील साखर निर्यातीवर बंदी आणली. याचवेळी चांगल्या पावसामुळे ब्राझीलचे साखर उत्पादन वाढले.
ब्राझीलच्या हंगामाच्या पहिल्या महिन्यापासून गेल्या वर्षीच्या तुलनेत 30 टक्क्यांनी उत्पादनात वाढ झाली. हेच प्रमाण हंगाम संपेपर्यंत म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत कायम राहिले. एन निनोमुळे साखर उत्पादक अन्य देशात उत्पादन कमी राहिले. यामुळे साखर उत्पादन कमी होणार अशी हवा तयार झाली. दरातही मोठी वाढ झाल्याचा फायदा ब्राझीलने उठविला. पहिल्या महिन्यापासून साखर निर्यात करण्यास सुरूवात झाली. हंगामाच्या मध्यात तर जहाजे नसल्याने लाखो टन साखर ब्राझीलच्या बंदरावर पडून असल्याचेही पाहायला मिळाले.
उच्चांकी प्रमाणात निर्यात अपेक्षित - सध्या तेथील हंगाम संपला असला तरी साखरेची मागणी कायम असल्याने निर्यातीची प्रक्रिया अखंड सुरू आहे. यामुळे उच्चांकी प्रमाणात निर्यात अपेक्षित असल्याचे चित्र सध्या तरी आहे. सध्या केंद्र सरकारने मात्र निर्यातीला परवानगीबाबत भाष्य केले नाही. पुढील वर्षीही निर्यातीला कितपत देईल याबाबत शाश्वती नाही. यामुळे येणार्या हंगामातही ब्राझीलच्या साखरेचे वर्चस्व कायम राहील, अशी चिन्हे आहेत. (अॅग्रोवन, 19.03.2024)