anekant.news@gmail.com

9960806673

जूनच्या पहिल्‍या पंधरवड्यात साखरेची मागणी, दरही स्थिर

कोल्हापूर ः
मॉन्‍सूनच्या पार्श्‍वभूमीवर साखरेच्या मागणीत वाढ नसल्याने दरही स्थिर असल्याचे चित्र आहे. गेल्या पंधरवड्याच्या तुलनेत जूनच्या पहिल्‍या पंधरवड्यातही दर ३६०० ते ३७०० रुपयांच्या दरम्यान आहेत. येत्या काही दिवसांनी पावसाने जोर धरल्‍यास मागणीत आणखी घट येण्याची शक्यता आहे. मेच्या पूर्वार्धापर्यंत साखरेचे दर ३८०० रुपयांवर होते. मेच्या उत्तरार्धानंतर साखरेचे दर कमी होण्‍यास सुरुवात झाली. जूनच्या पहिल्या सप्‍ताहात फारसा पाऊस झाला नाही. उत्तरेकडे अनेक राज्यांत उष्णतेची तीव्र लाट होती. यामुळे या भागातून साखरेला मोठी मागणी होती. उत्तरेकडील राज्यातील आइस्क्रीम उद्योजक व शीतपेय उद्योगातून मे- जूनच्या पहिल्या सप्‍ताहापर्यंत चांगली मागणी होती. उन्हाळा कायम असल्‍याने साखरेला मागणी टिकून राहिली.
१५ जूननंतर मात्र मागणी असली तरी ती मेच्या तुलनेत कमी असल्‍याचे साखर उद्योगातून सांगण्यात आले. संभाव्या पावसाळ्यामुळे शीतपेय उद्योगातून मागणी कमी राहील यामुळे घरगुती ग्राहकांच्या मागणीवरच कारखान्यांना अवलंबून राहावे लागेल. ही खरेदी नियमित असली तरी कमी प्रमाणात असते. अन्य उद्योगातून बल्क मागणी असल्‍याने मेमध्ये व्यापाऱ्यांनी साखर खरेदीला उत्साह दाखवला होता. पण सध्या गरजेइतकीच खरेदी होत असल्याने कारखाना सूत्रांनी सांगितले. एस ३० साखरेस महाराष्ट्रात ३६०० ते ३७००, उत्तर प्रदेशमध्ये ३७०० ते ३८००, गुजरातमध्ये ३७०० ते ३७५०, मध्‍य प्रदेशमध्ये ३७०० ते ३८०० रुपये प्रति क्विंटल इतके दर आहेत.
‘एमएसपी’ वाढीची चर्चा केंद्रात नवे सरकार आल्यानंतर पहिल्‍या काही महिन्यात साखर उद्योगाबाबत सकारात्मक निर्णय होणे अपेक्षित आहे. एमएसपी वाढीचा मुद्दा साखर उद्योगाकडून प्राधान्याने मांडण्यात येत आहे. कोणत्‍याही परिस्थितीत केंद्राने साखरेचे किमान विक्री मूल्य ४२०० रुपये करावे, अशी मागणी आहे. या मागणीकडेही साखर उद्योगाचे लक्ष लागले आहेत. सरकारने एमएसपीत वाढ केल्यास साखरेचे दर वाढतील या अपेक्षेत कारखानदार आहेत. यामुळे काही कारखानदार विक्रीसाठी अतिरिक्त प्रयत्न न करता जेवढी मागणी येईल तितक्‍या साखरेची विक्री करत असल्याचे चित्र आहे.