निवडणूक कार्यक्रम जाहीर ः 21 संचालक मंडळाच्या निवडणुकीकडे लक्ष
शिरोळ ः येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. 21 संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी येत्या 24 जुलैला मतदान होणार आहे. कारखान्याच्या 47 वर्षाच्या इतिहासात एक वेळच निवडणूक बिनविरोध झाली होती. इतर वेळी झालेल्या एकतर्फी विजय सत्ताधार्यांनी मिळविला आहे. त्यामुळे दत्तच्या निवडणुकीकडे सभासदांचे लक्ष लागून राहिले आहे.
महाराष्ट्र व कर्नाटक मल्टिीस्टेट म्हणून कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. शिरोळ, हातकणंगले, करवीर, कागल, चिकोडी, अथणी तालुक्यातील सभासदांचा यात समावेश आहे. कारखान्याचा पंचवार्षिक कार्यक्रम जाहीर झाला आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे निवडणूक निर्णय अधिकारी तर प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.
उत्पादक सभासदांमधून 16 जागा, उत्पादक सभासद अनुसूचित जाती 1, उत्पादक सभासद महिला 2, सामान्य बिगर उत्पादन आणि संस्था सभासद 2 जागा असे एकूण 21 संचालक निवडून द्यायचे आहेत. जवळपास 27 हजार सभासद मतदानास पात्र आहेत. सोमवार दि. 1 जुलै रोजी मतदानासाठी पात्र सभासद व संस्था प्रतिनिधींची कच्ची मतदार यादी जाहीर केेली जाणार आहे. 2 तेे 8 जुलै अखेर मतदारयादीवर हरकती घेण्याची मुदत आहे. 9 जुलैला पक्की मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 10 ते 16 जुलैअखेर नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत आहे. 18 जुलैला छाननी तर 19 ते 20 जुलै अखेर उमेदवारी अर्ज माघारीची मुदत आहे. 22 जुलैला सर्वसाधारण सभा होणार असून 24 जुलैला मतदान तर 25 जुलैला मतमोजणी होणार आहे. (लोकमत, 01.07.2024)