राज्य बँकेचा निर्णय ः खुल्या बाजारातील साखर दर घसरल्याने निर्णय
कोल्हापूर ः खुल्या बाजारात साखरेचे घसरल्याने आता महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेनेही साखरेच्या मूल्यांकनात 100 रूपयांची घट केली आहे. दोनच महिन्यांपूर्वी साखरेेचे मूल्यांकन 3400 रूपये केेले होते. आता 2 मार्चपासून हे मूल्यांकन 3300 रूपये असेल. नव्या मूल्यांकनानुसार कारखान्यांना प्रतिक्विंटल 2970 रूपये इतकी उचल मिळेल. राज्य बँकेेच्या या निर्णयामुळे कारखान्यांच्या अडचणीत वाढच होणार असल्याची प्रतिक्रिया साखर उद्योगातील तज्ज्ञांनी दिली.
केंद्र अजूनही साखरेच्या एमएसपीत वाढ करण्यास तयार नाही. सातत्याने वाढीव कोटे कारखान्यांना देत आहे. साखर मुबलक प्रमाणात बाजारात असल्याने साखरेच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य बँकेने हा निर्णय घेतल्याने साखर कारखाना वर्तुळात अस्वस्थता पसरली आहे. हंगामाच्या अंतिम टप्प्यात हा निर्णय घेतल्याने शेवटच्या टप्प्यातील उसाच्या बिलावर याचा प्रतिकुल परिणाम होऊ शकतो. ही बिले विलंबाने मिळण्याची शक्यता असल्याचे साखर उद्योगातून सांगण्यात आले.
2020 पर्यंत राज्य बँक दर तीन महिन्याला साखर दराचा आढावा घेऊन मूूल्यांकन ठरवत होती. यामुळे साखरेचे दर घसरल्यास त्याचा फटका कारखान्यांना बसत होता. मात्र, 2020 ला किमान विक्री इतकी किंमत धरून साखरेचे मूल्यांकन 3100 रूपये केले. यानंतर साखरेच्या दरात चढ-उतार होत राहिले. परंतु बँकेने कोणताच निर्णय घेतला नव्हता. काही कारखानदारांनीही मूल्यांकन वाढविण्याबाबत बँकेला विनंती केली होती. अखेर 3 वर्षांनी सकारात्मक हालीचाली करताना बँकेने 1 जानेवारीपासून मूल्यांकन वाढविले.
तत्पूर्वी बँक प्रशासनाने साखर संघाकडून साखर उत्पादनाला येणारा खर्च, मिळणारी किंमत याचा लेखाजोखा मागवला. व्यवस्थापन खर्चात वाढ झाल्याने अनेक कारखान्यांना एफआरपी देताना अडचणी येत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर बँकेने मूल्यांकनात वाढ करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर केवळ दोन महिन्यातच मूल्यांकन 100 रूपयांनी कमी केले. व्यवस्थापकीय संचालक दिलीप दिघे यांनी मूल्यांकन घटीचे पत्र कारखान्यांना पाठविले आहे.
* अनेक कारखान्यांनी यंदा साखरेचे उत्पादन कमी होणार असल्याने भविष्यात साखरेचे दर वाढतील या अपेक्षेने उत्पादकांनी एफआरपीपेक्षा जादा दर दिला आहे. अशा कारखान्यांची या निर्णयामुळे गोची होण्याची शक्यता आहे. सध्या अनपेक्षीतपणे वाढणारे साखर उत्पादन, केंद्राच्या हस्तक्षेपामुळे कमी झालेल्या किमती यामुळे साखर दरात वाढ होण्याची शक्यता धूसर बनली आहे. केंद्राने इथेनॉलकडेही अतिरिक्त साखर वळविण्यास हिरवा कंदील दाखवला नाही. एफआरपीत ही वाढ केली. साखर विक्री न होता तशीच शिल्लक राहिल्यास पुढील हंगामावरही याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. या सर्व घडामोडींमुळे कारखाने शॉर्टमार्जिनमध्ये येऊ शकतील, अशी भीती साखर उद्योगाला आहे.
बँकेच्या नव्या निर्णयामुळे ऊस बिलासाठी अतिरिक्त खर्च वजा जाता प्रतिक्विंटल केवळ 2120 रूपये शिल्लक राहणार आहेत. याशिवाय जर या कमी केलेल्या उचल दरामुळे अपुरा दुरावा निर्माण झाल्यास ती रक्कम प्रथम वसुल करून मग उरणारी रक्कम ऊस बिलासाठी अदा होणार आहे. त्यामुळे या शिल्लक रकमेतून एफआरपी कशी द्यायची, असा प्रश्न आहे. हा निर्णय म्हणजे आगीत तेल ओतण्याचाच प्रकार आहे. - पी.जी. मेंढे, साखरतज्ज्ञ
राज्य बँकेच्या निर्णयाचा दूरगामी विपरित परिणाम या हंगामाबरोबरच पुढील हंगामाला बसण्याची शक्यता आहे. साखरेला उठाव नसल्याने कारखाने अडचणीत असताना बँकेचा निर्णय कारखान्यांच्या चिंतेत भर टाकणार आहे. - विजय औताडे, साखरतज्ज्ञ (सकाळ, 05.04.2024)