यंदाचा ऊसगळीत हंगाम १५ ऑक्टोबरला सुरू होणार असे शासनातर्फे जाहीर करण्यात आले. परंतु नोव्हेंबर सुरू झाला तरी गाळप हंगाम सुरू झालेला नाही. बहुदा विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर गाळप हंगाम सुरू होईल, अशी शक्यता असली तरीही उजनी लाभक्षेत्र परिसरात कामगार ऊसतोड मजूर दाखल होऊ लागल्याने गावागावात गजबज वाढली आहे.
करमाळा तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाचे समजले जाणारे आदिनाथ सहकारी साखर कारखाना तसेच मकाई सहकारी साखर कारखाना हे सहकारी साखर कारखाने या वर्षीही चालू होतात की नाही, याबद्दल साशंकताच आहे.
तर भैरवनाथ शुगर लिमिटेड व कमलाई शुगर लिमिटेड या कारखान्याच्या बाबतीतही असेच वातावरण आहे. परिसरातील बहुतांश ऊस हा बारामती ॲग्रो लि. व अंबालिका शुगर लि. या कारखान्याकडे जातो. असे असले तरी कारखान्याचे ऊसतोड मजूर परिसरात दाखल होऊ लागले आहेत. २०२३/२४ चा गाळीत हंगामासाठी उसासाठी कारखान्याकडून दिवाळीत मिळणारे ऊसबील यावर्षी कोणत्याही कारखान्याने दिले नाहीत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यात नाराजी आहे. त्यामुळे बाजारपेठेत म्हणावी तशी तेजी दिसलीच नाही.
परिसरात ऊसतोडणीसाठी धुळे, नंदुरबार, बीड, आष्टी, माजलगाव, जामखेड, परभणी, नंदुरबार, नाशिक, यवतमाळ, वाशिम, मालेगाव, सटाणा, श्रीपूर, दोंडाईचा, अंमळनेर येथून ऊसतोड मजूर येतात. परंतु निवडणुका असल्याने हे मजूर निवडणुका संपल्यानंतरच दाखल होतील व त्यानंतरच गाळप हंगामाला गती येईल असे सांगितले जात आहे.