महाराष्ट्र 109 लाख टन साखर निर्मिती करत देशात प्रथम
कोल्हापूर ः कर्नाटक, गुजरातचा हंगाम पूर्णपणे आटोपला आहे. कर्नाटकात यंदाच्या हंगामात 50 लाख टन तर गुजरातमध्ये 9 लाख टन साखर उत्पादन झाले आहे. यंदा एप्रिलच्या मध्यापर्यंत महाराष्ट्र देशात सर्वाधिक 109 लाख टन साखर तयार करत उत्पादनात अग्रेसर आहे. त्या खालोखाल 101 लाख टन साखर निर्मिती करत उत्तर प्रदेश दुसर्या क्रमांकावर आहे, अशी माहिती इंडियन शुगर अॅण्ड बायोएनर्जी मॅन्यूफ्रॅक्चर्स असोसिएशनकडून (इस्मा) मिळाली आहे.
गेल्या वर्षी कर्नाटकात 54 लाख टन साखर तयार झाली होती. गुजरातमध्ये गेल्या वर्षी इतकीच साखर तयार झाली आहे. तमिळनाडूत 8 लाख टन साखर निर्मिती झाली. ती गेल्या वर्षीपेक्षा 2 लाख टनांनी कमी आहे. देशातील साखर उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ 2 लाख टनांनी कमी आहे. एप्रिल मध्याअखेर देशात 310 लाख टन साखर तयार झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत 312 लाख टन साखर निर्मिती झाली होती.
यंदा 532 साखर कारखान्यांनी हंगाम सुरू केला होता. त्यापैकी 448 कारखान्यांचा हंगाम संपला आहे. गेल्या वर्षी (2022-23) 533 साखर कारखान्यांनी हंगाम सुरू केला होता. या कालावधीत 401 कारखान्यांनी हंगाम संपविला होता. तर 132 साखर कारखाने सुरू होते. 312 लाख टन साखर तयार झाली होती.
गेल्या वर्षी या कालावधीत देखील महाराष्ट्राची आघाडी कायम होती. साखर उत्पादन 105 लाख टन झाले होते. गेल्या वर्षीपेक्षा महाराष्ट्रात 4 लाख टन साखर अधिकची झाली आहे. उत्तर प्रदेशात 96 लाख टन साखर निर्मिती झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्राचा हंगाम काहीसा उशिरा संपणार आहे. गेल्या वर्षी या कालावधीत राज्याचा हंगाम पूर्णपणे संपला होता. आता 15 कारखाने सुरू आहेत. आणखी 10 ते 15 दिवसांत राज्याचा हंगाम संपण्याची शक्यता आहे.