anekant.news@gmail.com

9960806673

सहवीजनिर्मिती युनिटमागे मिळणार दीड रूपया अनुदान

साखर कारखानदारांकडून निर्णयाचे स्वागत

सोमेश्‍वरनगर ः बगॅसच्या आधारावर सहवीजनिर्मिती करणार्‍या साखर साखर कारखान्यांना युनिटमागे दीड रूपये अनुदान देण्याचा निर्णय राज्स सरकारने घेतला आहे. यामुळे विजनिर्मितीला गती येऊन पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत 1350 मेगावॅट वीजनिर्मिती उद्दिष्ट साध्य होण्याचा अंदाज सरकारला आहे.

मात्र, सदरील अनुदान हे एक वर्षाचे असणार असल्याचे शासनाने म्हटले आहे. सरकारने अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातून 2025 पर्यंत 1350 मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे. साखर कारखान्यामार्फत बगॅसद्वारे ही वीजनिर्मिती होऊ शकते. मात्र वीज कंपन्यांचा वीज खरेदी दर हा 4 रूपये 75 पैसे ते 4 रूपये 91 पैसे एवढा प्रतियुनिट आहे.

कर्जावरील व्याज आणि वीजनिर्मितीचा खर्च हे सारे गणित एवढ्या दरात बसत नसल्यामुळे साखर कारखाने बगॅसपासून वीजनिर्मिती करायला फारसे उत्सुक नाहीत. त्यामुळे याला प्रोत्साहन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे कारखाने स्वतःच्या वापरासह वीज कंपन्यांनाही वीज देऊ शकतील. या पार्श्‍वभूमीवर सरकारने प्रतियुनिट दीड रूपया अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. हे अनुदान 6 रूपये युनिटपर्यंत दिले जाणार आहे.

ज्या कारखान्यांनी ज्या दराने वीज खरेदी करार केले आहेत ते पाहून 6 रूपयांच्या मर्यादेपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. राज्यात शासनामार्फत नवीन आणि नवीकरणीय उर्जेसाठी नवीन ऊर्जा धोरण शासन निर्णय घोषित केले असून 1350 मेगावॅॅट बगॅस आधारित आणि इतर बायोमास सहवीजनिर्मिती लक्ष्यासाठी हे धोरण आहे. या धोरानुसार अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून सन 2025 पर्यंत मेगावॅट ऊर्जानिर्मितीचा लक्षांक निर्धारित केलेला आहे.

बगॅस आधारित सहवीजनिर्मिती प्रकल्प कार्यरत असणार्‍या सहकारी साखर कारखान्यांना वीज खरेदी दरात रू. 1.50 प्रतियुनिट इतके अनुदान देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

राज्य सरकारने घेतलेला निर्णय हा निश्‍चतच कारखाना व शेतकर्‍यांच्या फायद्याचा असून या वाढीव दीड रूपयामुळे कारखान्याच्या उत्पदनात वाढ होणार आहे. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर ही एकप्रकारे दिलासा देणारी बाब आहे. - केशव जगताप, अध्यक्ष, माळेगाव साखर कारखाना

या निर्णयाचा कारखानदार व शेतकर्‍यांना फायदाच होणार आहे. पूर्वी युनिटला 4 रूपये 75 पैसे दर मिळता होता. तो आता युनिटला 6 रूपये मिळणार आहे. यामुळे कारखान्याचे उत्पन्न वाढले असून याचा शेतकर्‍यांना निश्‍चित फायदा होणार आहे. - पुरूषोत्तम जगताप, अध्यक्ष, सोमेश्‍वर कारखाना (लोकमत, 10.03.2024)