anekant.news@gmail.com

9960806673

मार्चअखेर कारखान्यांची धुराडी बंद होणार

साखर उत्पादनात घट ः आर्थिक नियोजन कोलमडणार
कुकाणे ः अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकारी व खासगी अशा १६ साखर कारखान्यांचे यंदाचा गळीत हंगाम ऊस टंचाईच्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी मार्चअखेर संपणार आहे. यामुळे यंदाच्या हंगामाची कारखान्यांची धुराडी २० ते २५ दिवसांत बंद होत असल्याने गतवर्षीच्या तुलनेत ३० टक्के साखरेचे उत्पादन कमी होण्याची चिन्हे आहेत. सर्वच कारखान्यांनी ठेवलेले गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण होण्याची शक्यता दिसत नाही. याचा आर्थिक फटका कारखाना व्यवस्थापनांना बसणार आहे.
जिल्ह्यातील राजकारण अर्थकारण साखर कारखान्यांशी निगडीत आहे. सर्वच तालुक्यात साखर कारखान्यांच्या चाकावर अर्थकारण फिरते. मुळा व भंडारदरा पाणलोट व जायकवाडी धरण लाभक्षेत्रामुळे उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले. दिवसेंदिवस कारखान्यांची संख्या वाढून त्यांनी गाळप क्षमताही वाढवली. यासाठी कोट्यावधी रूपये कर्ज काढले. मात्र, मागील २-३ वर्षांपासून उसाच्या क्षेत्रात घट होऊ लागली आहे. त्याचे पडसाद सध्या दिसून लागले आहेत. एप्रिल, मे पर्यंत चालणारे गळीत हंगाम आता फेब्रुवारी मार्चअखेरच येऊन ठेपले आहेत.
यंदा तर उसाच्या टंचाईमुळे सर्वच कारखान्यांना गाळपासाठी कसरत करावी लागली. उसाचे आगार म्हणून ओळख असलेल्या नेवासे तालुक्यातही उसाचे क्षेत्र कमालीचे घटले आहे. ज्ञानेश्वर व मुळा कारखान्यांचे ऊस गाळप होऊन जिल्ह्यातील इतर कारखान्यांना तालुक्यातून उसाचा पुरवठा होत होता. मात्र यंदा फेब्रुवारीअखेरच ऊस शिल्लक नाही. सध्या कार्यक्षेत्रात ३० ते ३५ हजारच हेक्टरवर ऊस शिल्लक आहाो. साधारण ८ दिवसांतच हा ऊस संपणार असल्याने फेब्रुवारीअखेरच धुराडी बंद होणार आहे.
यंदाच्या गळीत हंगामात जिल्ह्यातील कारखन्यांनी ठेवलेले उद्दिष्ट पूर्ण होणार नाही. बहुतांश कारखान्यांचे गाळप ३० ते ३५ टक्क्यांनी कमी होणार असल्याने कारखान्यांना त्याचा आर्थिक फटका बसणार आहे. साखरेेच्या उत्पादनातही मोठ्या प्रमाणात कमतरता होणार आहे. एकंदरीत यंदाचा गळीत हंगाम साखर कारखान्यांसाठी तोट्याचा ठरण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात १६ सहकारी व खासगी कारखान्यांनी २० फेब्रुवारी अखेर ७० लाख ६९ हजार २८१ मे.टन उसाचे गाळप करून ६२ लाख ९२ हजसा ७२० टन साखर पोत्याची निर्मिती केली आहे. दरवर्षी कोटींच्या पुढे होणारे जिल्ह्याचे गाळप व साखरेचे उत्पादन यंदाच्या गळीत हंगाम लाखांच्या आकड्यात राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात अंबालिका शुगर आजपर्यंत १२ लाख मे.टन उसाचे गाळप करून पहिल्या क्रमांकावर आहे, तर गंगामाई इंडस्ट्रीजने ७ लाख ९४ हजार ९२० मे.टन गाळप करून द्वितीय क्रमांकावर आहे. सहकारात ज्ञानेश्वरने ७ लाख ६८ हजार ७३० मे.टन गाळप करून जिल्ह्यात तिसरा व सहकारात पहिला क्रमांक लावला आहे.
जिल्ह्यात साखर कारखान्यांकडून ऊस पिकाला मिळत असलेला कमी दर, ऊस पिकासाठी लागणारे भांडवल पाण्याची कमतरता, पिकासाठी लागणारा वेळ, कमी वेळात इतर पिकांचे चांगले उत्पादन व भाव तसेच रोख पैसे मिळत असल्याने शेतकरी ऊस पिकाकडून इतर पिकांना प्राधान्य देत असल्याचे साखर उद्योगातील तज्ज्ञांचे मत आहे. (सकाळ, २३.०२.२०२५)