anekant.news@gmail.com

9960806673

सांगली जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांचा हंगाम आटोपला

जिल्ह्यातील यंदाचा पंधरा साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला असून दोन साखर कारखान्यांची धुराडी या आठवड्यापर्यंत बंद होतील. १७ साखर कारखान्यांनी ७६ लाख ६३ हजार टन उसाचे गाळप करत ८० लाख ६६ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.

यंदाचा गाळप हंगाम साडे तीन ते चार महिन्यांत आटोपला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात साखरेचे उत्पादन अंदाजे ५ लाख क्विंटलने घटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात यंदाच्या गाळप हंगामात १० सहकारी आणि सात खासगी साखर कारखान्यांनी हंगाम सुरू केला. यंदाचा हंगाम नोव्हेंबरच्या मध्यापासून सुरू झाला.

१७ साखर कारखान्यांनी ७६ लाख ६३ हजार ४०८ टन उसाचे गाळप केले असून ८० लाख ६६ हजार ०८० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. जिल्ह्याचा साखर उतारा १०.५३ टक्के इतका आहे. क्रांती साखर कारखान्याने सर्वाधिक उसाचे गाळप करत साखर उत्पादनात अग्रेसर ठरला आहे. हुतात्मा कारखाना उताऱ्यात पुढे आहे.

गतवर्षीही सतरा साखर कारखान्यांनी हंगाम सुरू केला होता. ८७ लाख ११ हजार ४०८ टन उसाचे गाळप करत ९७ लाख ८३ हजार २३९ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले होते. गत वर्षी पावसाच्या दडीमुळे लागवड लांबणीवर पडली होती. त्यानंतर जून ते ऑक्टोबर या दरम्यान अतिवृष्टी, परतीचा पावसामुळे उसाची अपेक्षित वाढ झाली नाही.

याचा फटका साखरेच्या उत्पादनावर झाला असल्याचे चित्र आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या गाळप हंगामात अंदाजे ५ लाख क्विंटलने उत्पादन कमी होईल, अशी शक्यता आहे.