anekant.news@gmail.com

9960806673

डिसेंबरअखेर देशाचे साखर उत्पादन ९५ लाख टनांवर

यंदाच्या हंगामात देशाचे साखर उत्पादन डिसेंबरअखेर ९५ लाख टनांवर पोहोचले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर उत्पादनाची गती अजूनही कमीच आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत १८ लाख टनांनी साखर उत्पादन मंदावले आहे. यंदाच्या हंगामातील तीन महिने पूर्ण झाले आहेत.

उत्तर प्रदेश, महाराष्ट्र कर्नाटक या आघाडीच्या तिन्ही राज्यांमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत साखर उत्पादन कमी होत आहे. महाराष्ट्रातील साखर उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत ८ लाख टनांनी पिछाडले आहे. उत्तर प्रदेश व कर्नाटकात प्रत्येकी तीन लाख टनांनी साखर उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे.

गेल्या वर्षी देशात डिसेंबरअखेर ५१८ साखर कारखाने ऊसगाळप करत होते यंदा ही संख्या ४९३ वर आली आहे. यंदा २४ कारखान्यांनी अद्याप हंगाम सुरू केलेला नाही. महाराष्ट्रात गेल्या वर्षी २०३ कारखाने सुरू झाले होते यंदा ही संख्या १९३ वर आली आहे. उत्तर प्रदेशात गेल्यावर्षी १२० साखर कारखाने सुरू झाले होते. यंदा १२१ साखर कारखाने ऊस गाळप करत आहेत. कर्नाटकातही चार कारखाने गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी सुरू आहेत.

गत वर्षी या कालावधीत १२२९ लाख टन उसाचे गाळप झाले होते. यंदा यात घट होऊन उसाचे गाळप होण्याचे प्रमाण १०९५ लाख टनांवर आले आहे. इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रातच ऊस तोडणीची गती कमी आहे. १३४ लाख टनांनी ऊस गाळप गेल्या डिसेंबरच्या तुलनेत मागे आहे. गेल्या वर्षी डिसेंबरअखेर महाराष्ट्रात ४२६ लाख टन उसाचे गाळप झाले होते. यंदा यात घट होऊन गाळप होण्याचे प्रमाण ३४६ लाख टनांवर आले आहे.

साखर उताऱ्यात ही पहिल्या तीन राज्यांमध्ये घट दिसून येत असल्याचे सध्या उत्तर प्रदेशचा साखर उतारा ८.९० टक्के, महाराष्ट्रचा ८.६० टक्के तर कर्नाटकचा साखर उतारा ८.५० टक्के इतका आहे.

प्रमुख राज्यांत उत्पादन १०० लाख टनांच्या आतच

यंदा साखर उत्पादन करणाऱ्या कोणत्याही प्रमुख राज्यामध्ये शंभर लाख टनांच्या वर साखर उत्पादन जाणार नाही, अशी शक्यता आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा उत्तर प्रदेशमध्ये ९८ लाख टन, महाराष्ट्रात ८७ लाख टन तर कर्नाटकात ४५ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे.