राज्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचत असून कारखाने वेगाने बंद होत आहेत. अंतिम टप्प्यातही ऊस उत्पादकांचा त्रास कमी झाला नसल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी विविध कारणे काढून पहिल्यांदा फड पेटवा मगच उसाला कोयता लावतो अशी आडमुठी भूमिका घेतली जात असल्याने आता अंतिम टप्प्यातील ऊस पेटवूनच कारखान्याला गाळपास द्यावा लागत आहे.
यंदा उसाच्या उत्पादनात अगोदरच घट निर्माण झालेली असताना पेटवल्यामुळे नुकसानीच्या गर्तेत शेतकरी जात असल्याचे वेदनादायी चित्र ऊस शिवारात आहे. उन्हाच्या तडाख्याने ऊसतोडणी कामगारही उसाची तोड करण्यास फारसे उत्सुक नाहीत. कसे तरी करुन ऊस संपविण्याच्या पावित्र्यात यंत्रणा असल्याचे विविध कारखाना स्तरावरचे चित्र आहे.
यंदाचा हंगाम कारखान्यांबरोबर ऊस उत्पादकांनाही फारसा फायदेशीर ठरला नाही. सुरुवातीच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात ऊस तोडणी यंत्रांचा वापर झाला. यामुळे क्षमतेपेक्षा अधिक उसाची तोड झाल्याने कारखान्यांचे ऊस अड्डे जाम झाले. अंतिम टप्प्यात नेमके विरोधी चित्र निर्माण झाले. मजुरांनी तोडणी सुरू झाल्यानंतर गाळपक्षमते इतकाही उसाचा पुरवठा कारखान्यांना होवू शकला नाही. अगदी महिन्याच्या कालावधीत परस्परविरोधी चित्र निर्माण झाल्याने ऊसतोडणी यंत्रणा गोंधळून गेली आहे.
साखर निर्मितीत घटचयंदाच्या हंगामावर नजर टाकल्यास गेल्या वर्षीपेक्षा तिप्पट वेगाने साखर कारखाने बंद होत आहेत. २ मार्चअखेर गतवर्षी केवळ ३३ साखर कारखाने बंद झाले होते. यंदा ४ मार्चअखेर २०० पैकी तब्बल १०२ साखर कारखान्यांनी आपला हंगाम समाप्त केला आहे. या मध्ये कोल्हापूर विभागात २२, पुणे विभागात १२, सोलापूर विभागात ४१, छत्रपती संभाजीनगर विभागात १०, अहिल्यानगर विभागात ६ तसेच नांदेड विभागातील ११ कारखान्यांचा समावेश आहे.
मागील हंगामात २०७ साखर कारखाने सुरू झाले होते. यात १०३ सहकारी, १०४ खासगी कारखान्यांचा समावेश होता. या कारखान्यांनी ९४१.०१ लाख टन उसाचे गाळप करून ९४ लाख टन साखरेचे उत्पादन केले होते. राज्याचा एकूण सरासरी साखर उताऱ्याचा दर सुमारे १०.०३ टक्के इतका होता. ७५ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी ९४ लाख टन साखरेची निर्मिती या कालावधीत झाली होती.
सोलापुरातील हंगाम आटोपलाराज्यात कारखाने बंद होण्याचा वेग सोलापूर विभागात अधिक आहे. सोलापूर विभागात ४५ कारखान्यांनी हंगाम सुरू केला होते. या विभागातील ३९ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम समाप्त झाला आहे. यंदा सोलापूर विभागात उसाची घटलेले उत्पादन, खोडवा उसाचे अधिक प्रमाण यामुळे ऊसतोडणी गतीने आटोपली. पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर विभागांतील ऊस हंगाम मार्च अखेरपर्यंत चालण्याची शक्यता आहे.