anekant.news@gmail.com

9960806673

राज्यात चांगल्या पावसाने 1 कोटी मे.टन ऊस वाढेल

जून जुलैमध्ये पडलेल्या पावसाने उसाला मिळाली संजीवनी
सोलापूर ः जून जुलै महिन्यात पडलेल्या दमदार पावसामुळे उसाला संजीवनी मिळाली असून राज्यात अगोदरच्या अंदाजापेक्षा 1 कोटीहून अधिक मे.टन ऊस वाढण्याचा साखर आयुक्त कार्यालयाचा अंदाज आहे. असे असले तरी पाऊस चांगला झाल्याने नव्याने लागवडीसाठी अधिक ऊसतोडणी होण्याचाही अंदाज व्यक्त करीत येत्या गाळप हंगामाचे नियोजन करण्यात आले आहे. मागील वर्षी झालेल्या गाळपापेाक्षा 172 लाख मे.टन गाळप कमी होण्याचा अंदाज आहे.
मागील वर्षीच्या अत्यल्प पावसाचा फटका जसा इतर पिकांना मोठ्या प्रमाणावर बसला तसा ऊस क्षेत्रालाही बसला होता. पाऊस कमी पडल्याने साखर कारखान्यांनी ऊसतोडणी पुरेशी यंत्रणा भरली नव्हती. मात्र डिसेंबर जानेवारीत अवकाळी पाऊस चांगला पडल्याने उसाच्या वजनात वाढ होण्यास मोठी मदत झाली. त्यामुळे मागील वर्षीचा गाळप हंगाम काही अंशी वाढला होता. मात्र पाऊ स कमी पडल्यानेच नवीन ऊस लागवड करण्यासाठी ऊस तुटला नव्हता.
यावर्षी जून महिन्यापासून सतत पाऊस पडत आहे. जवळपास चार महिने उसासाठी पोषक पाऊस पडत असल्याने वाढ चांगली होत आहे. धरण, तलाव, बंधारे, ओढे नाले भरून वाहत असल्याने मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांंनी नवीन ऊस लागवडीवर भर दिला आहे. राज्यात येत्या जानेवारीपर्यंत नवीन ऊस लागवड सुरू राहील असे सांगण्यात येते.
राज्यात ज्या ज्या जिल्ह्यात मोठी धरणे व तलाव ओसंडून वाहत आहेत अशा भागात शेतकर्‍यांचा ऊस लागवडीवर भर आहे. जून महिन्यापासून सुरू झालेल्या पावसामुळे राज्यात 10 लाख (एक कोटी) मे.टन ऊस ऊस वाढेल असा अंदाज आहे. मात्र पाण्याअभावी कमी झालेल्या ऊस क्षेत्रात आता नव्याने ऊस लागवड होत असल्याने बेण्यासाठी बराचस ऊस तुटणार आहे. बेणे, गूळ व रसवंतीसाठी 10 टक्के ऊस तुटेल असे गृहीत धरून गाळप हंगामाचे नियोजन करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. कृषी खात्याकडील नोंदीवरून राज्यात 11.67 लाख हेक्टर ऊस क्षत्र आहे.
साखर आयुक्त कार्यालयाचा अंदाज
* अगोदरच्या अंदाजानुसार राज्यात 900 लाख मे.टनापर्यंत ऊस उपलब्ध होईल असे सांगण्यात येत होते. आता मंत्री समितीच्या बैठकीसाठीच्या बुकलेटमध्ये 1004 लाख मे.टन ऊस उपलब्ध होईल असे नमूद केलेे आहे. त्यातील बेण्यासाठी 100 लाख मे.टन तुटेल व प्रत्यक्ष कारखान्यांना 904 लाख मे.टन उपलब्ध होईल असा साखर आयुक्त कार्यालयाचा अंदाज आहे.
* सरासरी 11.30 टक्के उतारा पडेल व 102 लाख मे.टन साखर तयार होईल मात्र त्यातील 12 लाख मे.टन साखर इथेनॉलसाठी वर्ग होईल असा अंदाज साखर आयुक्त कार्यालयाचा आहे.
* सरासरी हेक्टरी 80 ते 86 मे.टन वजन होईल. मागील वर्षी 1076 लाख मे.टन ऊस गाळप झाले होते. यंदा त्यात मोठी घट होऊन 904 लाख मे.टन ऊस गाळप होईल. म्हणजे मागील वर्षापेक्षा 172 लाख मे.टन ऊस गाळप कमी होण्याचा अंदाज आहे. (लोकमत, 30.09.2024)