anekant.news@gmail.com

9960806673

sugar writing news

कारखान्यात पुनर्प्राप्ती,पुनर्वापरातून मिळवले लाखो लिटर पाणी

साखर कारखानदारीमध्ये ऊस प्रक्रियेतून पुन्हा पाणी निर्मिती, काटेकोर पाणी वापर, सांडपाण्याची शुद्धता आणि त्याचा पुनर्वापर अशा विविध मार्गांचा अवलंब करत नॅचरल शुगर्सने लाखो लिटर पाणी मिळवले आहे. या पाण्याच्या बळावर बी. बी. ठोंबरे यांनी रांझणी गाव आणि कळंब तालुका परिसरात नंदनवन फुलवले आहे.

केंद्र सरकारने १९९८ मध्ये खासगी सहकारी साखर कारखान्यांना परवानगी देण्यास सुरुवात केली. २००० मध्ये महाराष्ट्रातील पहिला खासगी साखर कारखाना रांजणी (ता. कळंब, जि. धाराशिव) येथे नॅचरल शुगर सुरू झाला. त्याचे प्रणेते होते बी. बी. ठोंबरे. परिसरातील शेतकऱ्यांना सोबत घेत सुरू केलेल्या या साखर कारखान्याने केवळ साखर उत्पादनावरच न थांबता अल्कोहोल, विद्युत निर्मिती, स्टील, स्टील अलॉय, कंपोस्ट, बायोगॅस, दुग्धजन्य पदार्थ, शेडनेट भाजीपाला उत्पादन, भाजीपाला व फळे प्रक्रिया केंद्र असा वेगाने व्यावसायिक विस्तार केला. सोबतच स्थानिकांच्या मुलांसाठी शाळा, मुलींसाठी तंत्रज्ञान महाविद्यालय, ग्रामीण रुग्णालय असे कल्याणकारी प्रकल्प नॅचरल शुगर समूहाचे घटक आहेत. खरेतर या भागामध्ये पाण्याची मोठी कमतरता होती. साखर कारखानाच कसा चालेल, अशा वावड्या उठत असताना पाण्याच्या उपलब्धतेसाठी विविध स्रोतही विकसित केल्यानेच प्रगती साध्य झाली. पाणी उपलब्धतेचे विविध स्रोत विकसित करतानाच पाण्याचा काटेकोर वापर, सांडपाण्याची शुद्धता व त्याचा पुनर्वापर, ऊस प्रक्रियेतून पुन्हा पाणी निर्मिती अशा विविध मार्गांचा अवलंब करत ठोंबरे साहेबांनी या परिसरात नंदनवन फुलवले आहे. २००४ मध्ये नॅचरल शुगरची ऊस गाळप क्षमता प्रति दिन अडीच हजार टन होती. या साखर निर्मिती प्रक्रियेसाठी रोज सुमारे पाच लाख लिटर पाणी लागायचे. सर्वसाधारण महाराष्ट्रातील सर्वच साखर कारखाने सरासरी १५० दिवस चालतात. कारखान्याला साखर निर्मिती प्रक्रियेसाठी हंगामात साडेसात ते आठ कोटी लिटर पाणी लागते. हे फक्त प्रक्रियेसाठीच लागणारे पाणी आहे. पण एखादा कारखाना म्हटले की लोकांचा अन्य पाणी वापर, कामगार व ऊस तोडणी कामगारांची वसाहत, येणाऱ्या बैलगाड्यांना जोडलेले बैल यांच्या पिण्यासाठी लागणारे पाणी असा अन्य पाणी वापरही साधारणपणे इतकाच म्हणजे सुमारे आठ कोटी लिटर पाणी लागू शकते. २००४ मध्ये दुष्काळाची स्थिती होती. आधी लावलेला ऊस गाळपासाठी उपलब्ध असला तरी कारखाना चालविण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याची स्थिती निर्माण झाली. कारण दर वर्षी धरणातून आणलेले पाणी कारखान्याच्या साठवण तलावात साठवून वापरले जायचे. दुष्काळामुळे धरणच कोरडे पडले. सुरुवातीला आठ पंधरा दिवस जवळपासच्या विहिरी, कूपनलिकेमधून पाणी आणून कारखाना चालविण्याचा प्रयत्न केला. पण परिसरातल्या विहिरीही पुढील दहा दिवसात आटत गेल्या. संकट तर गंभीर होते.

या संकटातून मार्ग काढण्यासाठी बराच खल झाला. विविध पर्याय तपासण्यात आले. उत्तर मिळेना. या अस्वस्थतेत असतानाच ठोंबरे यांनी एकदम जाणवले की उसातच सुमारे ७० टक्के पाणी असते की! तेच तर काढून टाकून आपण साखर तयार करतो. मग साखर उत्पादन प्रक्रियेतील पाण्याची उपलब्धता कशी करता येईल, यावर त्यांची विचार प्रक्रिया सुरू झाली. ऊस रसात ७० टक्के पाणी असते. रसापासून साखर बनवताना यातील १५ टक्के पाणी साखरेबरोबर जाते. बगॅस (उसाचे चिपाड) बरोबर पंधरा टक्के पाणी जाते. १० ते १५ टक्के पाणी मोलॅसिस (मळी) बरोबर जाते. मग उरलेले ५० ते ५५ टक्के पाणी वाफेच्या स्वरूपात उडून जाते. मग ही सगळी वाफ अडवून थंड करून तिचे पाण्यात रूपांतर करण्याचे तंत्र वापरायचे ठरले. या पद्धतीने पाणी उपलब्ध करण्यासाठी कारखाना पातळीवरच त्यांनी तंत्र विकसित केले. त्यासाठी लागले जेमतेम तीन-चार लाख रुपये. वरवर पाहता साध्या वाटणाऱ्या या तंत्रामुळे साखर कारखानदारीत एक क्रांती घडली होती. कारण कारखान्याच्या प्रति दिन अडीच हजार टन ऊस गाळपातून कारखान्याला साडेबारा लाख लिटर पाणी उपलब्ध होऊ लागले. त्यातील पाच ते सहा लाख लिटर पाणी साखर कारखान्यासाठी वापरले जाऊ लागले. उरलेले सहा सात लाख लिटर पाणी डिस्टलरीसाठी उपलब्ध झाले. या बरोबरच कारखान्याच्याच अन्य प्रकल्पांना त्याचा वापर सुरू झाला. या पाणी पुनर्निर्मितीच्या क्रांतीने सर्व साखर कारखान्याला एक दिशा दाखवली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नॅचरल शुगरला हे पाणी उपलब्ध झाले नसते तर त्यावर्षी कारखानाच चालला नसता. प्रक्षेत्रातील सुमारे १० हजार शेतकऱ्यांचा सगळा ऊस शेतात वाळून ती कुटुंबे आर्थिकदृष्ट्या अडचणीत आली असती. एक हंगाम नाही, म्हणजे कारखानाही संपूर्ण तोट्यात. कारखान्याची आर्थिक गणिते पूर्ण कोलमडून कारखान्याच्या अस्तित्व आणि भविष्यावर प्रश्‍नचिन्ह लागले असते. या नव्या पाणी स्रोतामुळे कारखाना वाचला. इतकेच नव्हे तर या शाश्‍वत पाणी उपलब्धतेमुळे नॅचरल शुगर अन्य सोळा-सतरा नवीन व्यावसायिक उपक्रम राबवू शकली. आज त्यांची उलाढाल पाचशे कोटींपर्यंत पोहोचली आहे. त्यातून हजारो शेतकऱ्यांचे अर्थकारण स्थिरावले आहे.

आज दोनशेपेक्षा अधिक साखर कारखान्यांनी ही यंत्रणा बसवली असून, ऊस रसाच्या वाफेपासून पाणी मिळवत आहेत. सरासरी गाळप क्षमता पाच हजार टन धरली तरी रोजचे पंचवीस ते तीस लाख लिटर पाणी मिळू शकते. अशा दोनशे कारखान्याची बेरीज जाते रोज ६० कोटी लिटर पाण्यापर्यंत. वर्षभरातून किमान १५० दिवस कारखाने चालतात. म्हणजे १५० दिवसांत सर्व कारखान्यांमध्ये नऊ हजार कोटी लिटर पाण्याची पुनर्निर्मिती होऊ शकते. पाण्यातून आर्थिकदृष्ट्या संपन्नतेकडे... नॅचरल शुगर्सची पाणी पुनर्निर्मिती व पुनर्वापराची यशकथा संपूर्ण महाराष्ट्रातील साखर कारखानदारीला मार्गदर्शक व प्रेरक ठरत आहे. धाराशिव सारख्या दुष्काळी पट्ट्यातही साखर कारखाना यशस्वीपणे चालवत आहेत. इतकेच नाही, तर या उद्योगसमूहाने नवनवीन व्यवसाय उपक्रम उभारत कळंब आणि शेजारच्या तालुक्यातील जवळजवळ १५० गावे आर्थिकदृष्ट्या समृद्ध केली आहेत. दहा ते बारा हजार कुटुंबे ऊस उत्पादनातून, आणि पंधरा हजार कुटुंबे दूध व्यवसायातून संपन्न झाली आहेत. या व्यवसाय उपक्रमातून सहा हजार लोकांना प्रत्यक्ष रोजगार, तर जवळ जवळ तितक्याच लोकांना अप्रत्यक्ष रोजगार लाभला आहे. या सर्व उपक्रमांना आपल्या दूरदृष्टीने दिशा देणाऱ्या बी. बी. ठोंबरे यांना आजवर किमान २५ राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

पाण्याचा पुनर्वापर साखर कारखान्यातून महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने दिलेल्या मानांकनानुसार जास्तीत जास्त चारशे लिटर प्रति टन इतके सांडपाणी सोडण्यास परवानगी असते. असे असताना नॅचरल शुगर कारखान्यातून फक्त ५० ते ७० लिटर प्रति टन इतकेच सांडपाणी बाहेर जाते. उसाच्या रसाच्या पाण्यापासून झालेल्या वाफेच्या दबावातून टर्बाईन्स फिरवून विद्युत ऊर्जा बनवली जाते. त्यानंतर त्याच वाफेचे पाण्यात रूपांतर केले जाते. म्हणजे वाफेचा दुहेरी उपयोग होतो. आता कारखान्याला लागणारे पाणी साखर कारखान्यातूनच मिळते. डिस्टलरीच्या सांडपाण्यातूनही चांगले पाणी मिळविण्यासाठी वेगळ्या प्रकारची प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेतून वर्षाला पन्नास हजार घनमीटर मिथेन आणि तितक्याच प्रमाणात कार्बन डायऑक्साइड तयार केला जातो. हा मिथेन वायू इंधन म्हणून वापरून पुन्हा त्यातूनही वाफेद्वारे विद्युत निर्मिती होते. कार्बन डायऑक्साईडचे कॉम्प्रेशन करून ‘ड्राय आइस’ तयार केला जातो. त्याच्या विक्रीतून कारखान्याला उत्पन्नाचा स्रोत तयार झाला आहे. डिस्टिलरीच्या पाण्यातून मिथेन आणि कार्बन डायऑक्साइड काढून घेतल्यामुळे शुद्ध पाणी उपलब्ध होते. या पाण्याचा विविध कारणांसाठी पुनर्वापर केला जातो. सगळ्यात परमोच्च बिंदू म्हणजे डिस्टिलरीतून अजिबात प्रदूषण होत नाही. ज्वलनासाठी बायोगॅस वापरला जात असल्याने धूर आणि हवेच्या प्रदूषणाचा प्रश्‍नच उरत नाही.

--सतीश खाडे, ९८२३०३०२१८,
(लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या ‘अभिनव जलनायक’ या पुस्तकाचे लेखक आहेत.)