anekant.news@gmail.com

9960806673

sugar writing news

ऊस गोड झाला म्हणून...

ऊस पीक आणि त्यावर उभ्या असलेल्या कारखानदारीने राज्याचे ग्रामीण अर्थकारण बदलून टाकले, ही वस्तुस्थिती आहे. परंतु मागील दशकभरापासून उसाचा वाढता उत्पादन खर्च आणि कमी उत्पादकतेमुळे उत्पादकांसाठी ऊस कडू ठरत आहे. गोड उसाच्या गोड आठवणींना पुन्हा उजाळा देण्याची हीच वेळ आहे.

ऊस गोड लागला म्हणून मुळासह खाऊ नये, अशी म्हण असणाऱ्‍या उसाच्या अनेक कहाण्या आहेत. उसाने मागील ५०-६० वर्षांमध्ये अनेक परिवर्तन बघितलेले आहेत. सहकारी तत्त्वावर चालणाऱ्‍या अनेक संस्थांपैकी साखर कारखाने ही एक संस्था असली तरीही साखर कारखानदारीमुळेच सर्वसामान्य शेतकरी प्रक्रिया उद्योग आणि कारखानदारीचा मालक झाला. ग्रामीण विकासाची जननी म्हणून साखर कारखानदारीचे नाव घेतले जाते.देशामध्ये जवळपास पाच लाख विविध प्रकारच्या सहकारी संस्थांचे जाळे पसरलेले असून, २२ कोटी सभासदांद्वारे ७१ टक्के ग्रामीण भागातील समाजाचा यामध्ये सहभाग आहे.

देशातील एकूण साखर कारखान्यांपैकी ४५ टक्के साखर कारखाने सहकारी क्षेत्रात आहेत. या उद्योगावर एक लाखापेक्षा जास्त साखर कामगार आणि पाच लाखांपेक्षा जास्त ऊस तोडणी कामगार अवलंबून आहेत. तसेच दीड कोटी माणसांना प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रोजगार निर्माण करून देण्यात येतो.

हजारो कोटींचा व्यवहार असलेली साखर कारखानदारी आज राज्यातील १६ लाख ऊस उत्पादक आणि 8 लाख हेक्टर क्षेत्रावरील उसावर अवलंबून आहे. ही आकडेवारी बघितल्यानंतर ऊस शेती आणि साखर कारखानदारी म्हणजे आर्थिक घबाड आहे, असे चित्र दिसते. परंतु या उद्योगावर आधारित असलेल्या सर्वांना वेळोवेळी झटके बसलेले आहेत.

ऊस शेती आणि साखर कारखानदारी यावर सतत विचारमंथन होणे गरजेचे आहे. विशेषतः ऊस, उसाखालील जमीन, उसाची उत्पादकता आणि गुणवत्ता, साखर उत्पादन, साखरेविषयी सरकारी धोरण आणि सहकारातील काही अपप्रवृत्ती यांच्यावर चर्चा होऊन वेळीच योग्य निर्णय घेतला नाही तर केलेल्या उपचाराचाही फायदा होत नाही.महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचा खरा विकास झाला असेल तर त्याचे बरेचसे श्रेय जाते ते ऊस पिकाला. जेथे चांगल्या प्रकारची राजकीय जागृती होती किंवा चांगले नेतृत्व होते तेथे सहकारी साखर कारखानदारी सुरू झाली.

साखर कारखानदारीतून ग्रामीण भागात पैसा आला आणि या पैशामुळे शिक्षण, आरोग्य राहणीमान आणि इतर ग्रामीण सुधारणेला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळाले.ऊस शेतीमधून चांगला पैसा मिळू लागल्यामुळे उसाकडे जास्तीत जास्त शेतकरी आकर्षित झाला. सुरुवातीच्या काळात जमिनी चांगल्या होत्या आणि मुबलक पाणी त्यामुळे उसाचे एकरी उत्पादन मोठ्या प्रमाणात मिळाले. तसेच त्याकाळी उसाला भावही चांगला मिळत असे. त्यामुळे ऊस बागायतदारांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त पैसा मिळत गेला.त्यांच्याकडे असलेल्या जमीन- पाणी- पीक पद्धतींचेही नियोजन झाले नाही. जमिनी क्षारवट- चोपण झाल्या. उत्पादन घटू लागले.

ऊस बागायतदारांमुळे फुललेल्या शहरातील बाजारपेठा ओस पडू लागल्या. ऊस बागायतदारांच्या प्रगतीचा वेग ज्या झपाट्याने होता त्याच झपाट्याने त्याची अधोगती होत गेली. एकाच पिढीने ही सर्व स्थित्यंतरे बघितली.

उसाची उत्पादकता हरितक्रांतीपूर्वीही हेक्टरी १०० च्या पुढे होती. हरितक्रांतीनंतर म्हणजे १९६५ नंतरही उसाची उत्पादकता हेक्टरी १०० टनाच्या पुढे गेली. अनेक शेतकरी एकरी १०० टनांपर्यंत उत्पादन घेत होते. उसापासून जास्त पैसा मिळू लागल्यामुळे रासायनिक खते, पाणी यांचा भडिमार वाढला. त्याचा परिणाम विपरीत होऊन उत्पादकता घटत गेली.

शेतीसाठी कोणत्याही तंत्रज्ञानाचा सर्वांत कमी वापर करणारा शेतकरी म्हणजे ऊस बागायतदार अशी त्याची ख्याती झाली.फलोत्पादन, भाजीपाला किंवा इतर पिकांमध्ये शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात करून उसापेक्षा जास्त उत्पादन घेऊ लागले. उसाला शाश्‍वत बाजारपेठ असूनही तसेच पिकाचे उत्पादन हमखास येत असूनही हे पीक आर्थिकदृष्ट्या मागे पडू लागले. त्याचे मुख्य कारण म्हणजे एकरी उत्पादकता ३० ते ३५ टनांपर्यंत घसरली. त्याचबरोबर उत्पादन खर्चात वाढ होत गेली.आज ऊस पीक आणि ऊस बागायतदारांबद्दल देखील चांगले बोलले जात नाही. एकतर ऊस पीक हे सर्वांत जास्त पाणी घेणारे पीक आहे, असे म्हटले जाते.

कारण एकूण लागवडीखालील क्षेत्राच्या ६ ते ७ टक्के क्षेत्र उसाखाली असून साठविलेल्या एकूण पाण्याच्या ६० टक्क्यांपेक्षा जास्त पाणी ऊस बागायतदार वापरतात.उसाचे प्रत्येक पाणी ३० सें.मी. म्हणजेच जवळपास २० लाख लिटर पाणी आणि पिकाला कमीत कमी १० ते १२ पाणी दिले तर दरवर्षी २५० ते ३०० सें.मी. पाणी दिले जाते. एवढ्या पाण्यातून हेक्टरी कमीतकमी २५० ते ३०० टन क्षार पाण्यातून दिले जातात. काही क्षार जमिनीतून बाहेर गेले तरी या क्षारांचे प्रमाण वाढत जाऊन हजारो हेक्टर जमिनी क्षारवट-चोपण झाल्या. काही जमिनींमध्ये तर तणेही उगवत नाहीत.

हजारो वर्षांच्या मानवाच्या आणि निसर्गाच्या कष्टातून तयार झालेल्या जमिनी मागील ४०-४५ वर्षांत संपविण्याचे काम झाले आहे. या सर्वांचे खापर ऊस बागायतदारांच्याच डोक्यावर फोडले जाते. ऊस पीक ऊस बागायतदारांना साथ देत नाही. समाजामध्ये ऊस बागायतदारांची पत राहिलेली नाही.मागील दशकापासून ऊस उत्पादक आर्थिक अडचणीत सापडलेला आहे.

आता योग्य वेळ आलेली आहे ती या अडचणींतून बाहेर पडण्याची. गोड उसाने दिलेल्या गोड अनुभवाच्या स्वप्नातून उठून सत्य स्थितीचा अभ्यास करून अंग झटकून, आळशीपणाचे कवच फोडून नव्या उमेदीने गोड ऊस आणि त्यापासून मिळणाऱ्या गोड आठवणींना पुन्हा उजाळा देण्यासाठी प्रयत्न करण्याची हीच वेळ आहे.