कारखान्याच्या गाळप क्षमतेनुसार उसाचा खात्रीशीर पुरवठा होण्यासाठी योग्य प्रकारे वाणनिहाय लागवड होणे आवश्यक आहे. लागण वेळापत्रकामध्ये वेगवेगळ्या वाणांची पक्वता गटांनुसार वेगवेगळ्या कालावधीमध्ये लागण करावी. त्यामुळे गाळप हंगामामध्ये योग्य प्रकारे तोडणी नियोजन वेळापत्रक करून कारखाना संपूर्ण क्षमतेने चालवता येते.
शेतकर्यांना उसाचे जास्तीत जास्त उत्पादन आणि कारखान्यास जास्तीचा उतारा मिळण्यासाठी प्राप्त परिस्थितीमध्ये पारंपरिक आणि यंत्रांच्या साह्याने शास्त्रोक्त पद्धतीने ऊसतोडणी व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. तोडणी व्यवस्थापनामध्ये शेतकर्यांचा ऊस योग्य पक्वता अवस्थेत व कमीत कमी वेळेमध्ये गाळपास आणणे आणि कारखाना पूर्ण क्षमतेने चालवण्यास पुरेशा प्रमाणात ऊस पुरवठा करणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.
ऊसतोडणी व्यवस्थापनातील घटक
* संपूर्ण गाळप हंगामात पूर्ण क्षमतेने कारखाना सुरू ठेवण्यासाठी खात्रीपूर्वक ऊस उपलब्ध असावा.
* दर्जेदार प्रतीच्या उसाची गाळप हंगामात उपलब्धता
* पुरेशा प्रमाणात ऊसतोडणी कामगार, तोडणी यंत्राची उपलब्धता
* योग्य प्रकारे ऊसतोडणी पद्धती. तोडणी झाल्यानंतर तत्काळ वाहतूक व्यवस्था.
* योग्य पक्वतेच्या उसाची तोडणी योग्य वेळेवर होणे गरजेचे
* काही कारणास्तर जर ऊस पुरवठा कमी होत असेल तर आपत्कालीन यंत्रणा असावी.
खात्रीशीर ऊस उपलब्धता
* दररोजच्या गाळप क्षमतेप्रमाणे पुरेशा प्रमताणात उसाची उपलब्धता आसावी. त्यामुळे रोजची तोडणी व गाळप यांचे योग्य संतुलन होते. गाळप क्षमता ही प्रतिदिन गाळप ऊस टनामध्ये मोजला जातो.सुरूवातीस गाळप क्षमता १२५० टीसीडी एवढी होती. त्यानंतर ती २५०० टीसीडी एवढी वाढ झाली. आता महाराष्ट्रातील बर्याच कारखान्यांची गाळप क्षमता ५ हजार टीसीडीपेक्षा जास्त आहे. कारखान्याच्या गाळप क्षमतेनुसार उसाचा खात्रीशीर पुरवठा होण्यासाठी योग्य प्रकारे वाणनिहाय लाागवड होणे आवश्यक आहे. लागणीची प्रत्येक आठवडानिहाय नोंद तारीख उपलब्ध असणे महत्त्वाचे आहे. वाणांच्या लागण वेळापत्रकामध्ये वेगवेगळ्या वाणांची पक्वता गटांनुुसार वेगवेगळ्या कालावधीमध्ये लागण करावी. त्यामुळे गाळप हंगामामध्ये योग्य प्रकारे तोडणी वेळापत्रक करून कारखाना संपूर्ण क्षमतेने चालवता येतो.
* २५०० टीसीडी क्षमतेच्या कारखान्यासाठी साधारणपणे ८० टन प्रति हेक्टरी उत्पादन असलेल्या साधारणतः ३२ हेक्टर क्षेत्राची प्रतिदिन गरज लागते. त्यामुळे ही गरज भागवण्यासाठी कार्यक्षेत्रातील विविध गटांतील ऊस वाणानुसार आणि लागवडीनुसार उसाचे प्रति हेक्टरी उत्पादन माहिती असायला हवे. त्यानुसार लागणीखालील ऊस क्षेत्र तयार करावे लागेल.
* पाठीमागील वर्षाचा खोडवा क्षेत्र आणि त्याच्या उत्पादनाची नोंद घेऊन खोडवा क्षेत्राची अग्रक्रमाने तोडणी कार्यक्रमात सामावून नियोजन करावे.
* सभासदांच्या गटनिहाय ऊस लागवड नोंदी घ्याव्यात. वाणांच्या पक्वतेनुसार तोडणी नियोजन करावे, अन्यथा सभासद जो कारखाना लवकर ऊस नेईल त्यांना किंवा गुर्हाळाला ऊस देेतात. त्यामुळे अपेक्षित क्षेत्र कमी होईल. उसाची इतरत्र होणारी विभागणी ही कारखान्यापुढील प्रमुख समस्या बनली आहे. बाजारातील गुळाच्या किमती वाढल्या तर शेतकरी गुर्हाळाला ऊस देतात. दूरच्या कार्यक्षेत्रातील कारखाने जास्त भावाची हमी देतात त्यामुळे त्या कार्यक्षेत्रातील उसाची विभागणी होते.
* प्रत्येक कारखान्याचे कार्यक्षेत्र व भौगोलिक व्याप्ती ठरली आहे. परंतु या कार्यक्षेत्राच्या नियमांचे पालन केले तर संबंधित कारखान्यास ऊस कमी पडणार नाही. या भौगोलिक आखणीमुळे कारखान्यामध्ये र्स्प्धा होणार नाही. परंतु त्यासाठी कारखान्यांनी पण रास्त व किफायतशीर हमीभाव शेतकर्यांना देऊन कारखाना आणि शेतकर्यांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते टिकवायला हवे.
* संगणकीकृत व मोबाईल अॅपद्वारे कारखान्याकडे ऊस लागण नोंदणी येते, त्यामुळे पक्वतेनुसार संबंधित शेतकर्याचा ऊस तोडला जाईल, याचे काटेकोर नियोजन करावे.
दर्जेदार ऊस उपलब्धता
* रसामध्ये सुक्रोज (साखर) प्रमाण जास्त असावे.
* साखर सोडून इतर पदार्थांचे प्रमाण (नॉन शुगर) कमी असावे.
* रसाची शुद्धता चांगली असावी. भरपूर प्रमाण असावे.
* तंतूमय पदार्थाचे प्रमाण कमाल असावे.
* वाळलेले पाचट, बांधणीचे वाडे, वाळलेले ऊस, माती व पानफुटव्याची संख्या अत्यंत नगण्य प्रमाणात असावी.
* उसाच्या मध्यभागातील पोकळी (दशीचे प्रमाण) चिपाड, तुर्याचे प्रमाण कमी असावे.
ऊसतोडणीचे वय
* ऊस आणि साखरेचे उत्पादन पक्वतेचे वय आणि वातावरण अवलंबून असते. त्यामुळे वाणांच्या पक्वतेच्या गटांनुसार, वयानुसार त्यांची गुणवत्ता व सर्वोच्च उत्पादन पातळी ठरलेली असते. त्यामुळे लागणीची तारीख आणि वाण पक्वतेच्या गटानुसार तोडणीच्या योग्य वेळा ओळखाव्या लागतात. ज्या वाणांमध्ये त्यांच्या सर्वोच्च पक्वतेचा कालावधी व गुणवत्ता उशिरापर्यंत टिकवून ठेवण्याची क्षमता असते, असे वाण शेतकर्यांसाठी उपयुक्त ठरतात.
* वाणांच्या पक्वतेमध्ये असणार्या वैविध्यतेमुळे साखर उतार्यावर कमी जास्त प्रमाणात परिणाम होत असतो. कारखाना गाहप हंगामाच्या सुरुवातीस जर कमी पक्वतेचा ऊस गाळपाला आला तर साखर उतारा कमी येतो. कारखानाच्या गाळप हंगाम ६ ते ८ महिन्यापर्यंत असल्यास आणि त्यांनी योग्यरित्या वाणांच्या लागणीचे वेळापत्रक केले नाही तर त्यांना सुरूवातीचे फक्त १ ते २ महिने गाळपास ऊस उपलग्ध होतो. त्यानंतर मात्र अपरिपक्व ऊस गाळपास येतो. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जर १ ते २ वाणांचे कार्यक्षेत्र असेल तर ही समस्या बिकट होते.
* बर्याच क्षेत्रांमध्ये तुरा असलेला ऊस गाळप हंगाम लांबल्यानंतर गाळपास येतो. त्यामुळे उत्पादन आणि साखर उतार्यात प्रचंड घट निर्माण होते. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आडसाली लागण हंगाम क्षेत्रामध्ये ही अवस्था सर्वत्र दिसून येेते. त्यामुळे आठवडानिहाय आणि वाणनिहाय खंडित लागण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्यामुळे प्रत्येक आठवड्यात योग्य पक्वतेचा ऊस गाळपास येईल. कमी वयाच्या व कमी पक्वतेच्या उसाच्या रसामध्ये सुक्रोजचे (साखरेचे) प्रमाण कमी असते. जास्त प्रमाणात रिड्युसिंग शुगर व शुद्धता कमी राहते. अतिपक्व उसामध्ये तंतुमय घटकांचे प्रमाण, रसाचे कमी प्रमाण आणि चोयट्याचे प्रमाण वाढून साखरेचा र्हास सुरू होतो. एकूण उत्पादन व उतार्यात घट येते.
* मध्यम पक्वता गटातील ऊस वाणांचे अधिकतम वय हे १३ ते १४ महिने, तर उशिरा पक्व होणार्या गटातील वाणांचे वय १४ ते १५ महिने असते. लवकर पक्वता गटातील काही वाण हे ११ ते १२ महिन्यांत तोडणीस तयार होतात. अति लवकर पक्व होणार्या गटातील वाणांचे वय हे १० ते ११ महिने असते.
तोडणीपूर्व पक्वता सर्व्हेक्षण
* फक्त चांगले वाण लावून ठरावीक वेळेत तोडणी करून चांगले उत्पादन आणि उतारा मिळेल हा एक चुकीचा ठोकताळा आहे. उत्पादकता आणि योग्य पक्वता वेळ/ कालावधी ही अनेक कारणांवर अवलंबून असते. त्यामध्ये कृषी हवामान परिस्थिती, दर्जेदार पीक व्यवस्थापन हे महत्त्वाचे घटक आहेत.
* ऊस पक्वतेेचा कालावधी आणि गुणवत्ता योग्य सिंचन, अन्नद्रव्यांवर अवलंबून असते. एखादा वाण ठरावीक वेळेत तशाच प्रकारच्या जमिनीत लावला आणि व्यवस्थापनात बदल झाला तर गुणवत्तेवर परिणाम होतो. त्यामुळे तोडणीपूर्व सर्व्हेक्षण करून गुणवत्तेनुसार आणि पक्वता श्रेणीनुसार तोडणी करायला हवी.त्यामुळे चांगल्या गुणवत्तेचा, योग्य पक्व झालेला ऊस दररोजच्या गाळपाला पुरवला जाईल. या सर्व्हेक्षणामुळे कारखान्याच्या साखर उतार्यात ०.५ ते ०.८ टक्का वाढ होऊ शकते. त्यामुळे निव्वळ नफ्यात वाढ होऊन खर्चात बचत होते.
* पूर्वतोडणी पक्वता सर्व्हेक्षण हे कारखान्याच्या ऊस विकास अधिकार्याच्या देखरेखेखाली, जाणकार व अनुभवी मनुष्यबळाकडून करून घ्यावे. त्यासाठी शेंड्याकडील आणि जमिनीलगतच्या कांड्यातील ब्रिक्स नोंदणी घ्यावी. टॉप बॉटम गुणोत्तराच्या माध्यमातून पक्वतेनुसार उसाचे वर्गीकरण करून तोडणीचे नियोजन करावे. ब्रिक्स नोंदणी करताना त्या क्षेत्रातील प्रातिनिधीक स्वरूपातील उसाच्या ब्रिक्सची नोंद करावाी. यामध्ये त्या क्षेत्रातील चारी कोपर्याच्या आतील आणि पाचव्या भाग क्षेत्राच्या मध्यभागातील निवडून एकूण ५ भागातील प्रातिनिधीक उसातील ब्रिक्सची नोंद करावी. शक्य असेल तर लहान स्वरूपातील मिल चाचणी (एसएसमटी) करावी म्हणजे पक्वता लक्षात येईल.
तोडणी क्रमातील समस्या
* आठवडानिहाय पूर्वतोडणी पक्वता सर्वेक्षण झाल्यानंतर हंगामनिहाय आणि वाणनिहाय लागण नोंदी कारखान्याच्या ऊस विकास विभागाकडे उपलब्ध असतात. त्यानुसार तोडणीचे नियोजन अग्रक्रमाने केले जाते.
* सध्या संगणकीकृत सॉफ्टवेअरच्या माध्यामातून लागण नोंदी घेऊन नियोजन केले जाते. ऊस विभागाकडून शेतकर्यांना एक महिना अगोदर तोडणीचे पूर्वकल्पना दिली जाते. महाराष्ट्रातील बरेच कारखाने व्हीएसआय कडून लागण आणि तोडणी कार्यक्रमाचे नियोजन करून घेतात.
वाणांचे एकत्रीकरण
* गाळप सरू झाल्यापासून उतारा टिकून ठेवण्यासाठी गाळप करताना त्यामध्ये पक्व झालेल्या इतर वाणांचे मिश्रण करून गाळप करावे. त्यामुळे उसाच्या रसाची प्रत आणि गुणवत्ता टिकून राहते.
- डॉ. गणेश पवार, फोन नं. ९६६५९ ६२६१७ (लेखक ऊस पीक तज्ज्ञ आहेत) (अॅग्रोवन, २२.१०.२०२५)