anekant.news@gmail.com

9960806673

sugar writing news

शाश्वत ऊस खोडवा उत्पादनाचे तंत्रज्ञान

हेक्टरी ८ ते १० टन पाचट निघते, याचा सेंद्रिय खत म्हणून वापर करावा. ऊस तुटून गेल्यानंतर शेतामध्ये राहिलेले पाचट न जाळता सर्व सर्‍यांमध्ये आच्छादन करावे. वरंबे मोकळे राहतील याची काळजी घ्यावी. शेतामध्ये ऊस पाचट कुजविण्यासाठी हेक्टरी ८० किलो युरिया १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट व २.५ लिटर पाचट कुजविणारे द्रवरूप जिवाणू संवर्धक वापरावे.
राज्यामध्ये सर्वसाधारणपणे ४० ते ४५ टक्के क्षेत्र हे खोडव्याखाली असते. खोडवा पिकाचे उत्पादन कारखाना आणि शेतकरी या दोघांनाही आर्थिकदृष्ट्या फायद्याचे असते खोडव्यामध्ये लागणीच्या उसापेक्षा ३५ ते ४० टक्के खर्च कमी येतो. त्यामुळे खोडव्याचे शाश्वत उत्पादन येण्यासाठी आधुनिक तंत्राचा वापर करणे खूप आवश्यक आहे.
खोडवा ठेवण्याची कारणे
* पूर्व मशगतीची गरज नसल्यामुळे शेतकर्‍यांना खर्च, वेळ आणि श्रमात मोठ्या प्रमाणात बचत होते.
* बेणे, बेणे प्रक्रिया व लागण खर्चात बचत होते.
* मुळे व डोळे तयार असल्यामुळे खोडवा चांगला फुटून एकसारखी वाढ होते.
* एकरी पक्व उसाची संख्या चांगली मिळते.
* खोडवा लागणीपेक्षा एक ते दीड महिना अगोदर पक्व होतो.
* पाचट आच्छादन केल्यास तण काढणी व अंतर मशागतीच्या खर्चात बचत होते.
* खोडवा पीक पाण्याचा ताण अधिक सहन करू शकते, त्यामुळे सिंचनाच्या पाण्यात बचत होते.
खोडवा व्यवस्थापनाचे सुधारित तंत्र
बुडखा छाटणी
* चांगल्या उत्पादनासाठी खोडवा ऊस डोेळा जमिनीतूनच उगवणे आवश्यक असते. त्यामुळे जमिनीलगत ऊस तोडणी होणे अत्यंत आवश्यक आहे.
* जमिनीच्या वर २ ते ३ कांड्या ठेवून तोडणी केल्यास खोडव्याची उगवण कमी होते. हेक्टरी उत्पादन घटते.
* कांडी कीड, खवले किडीचा प्रादुर्भाव झाल्यास उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटते.
* जमिनीवर राहिलेल्या कांड्यांवरील डोळे प्रथम फुटतात, कांडीत साठलेल्या रसावर वाढतात, परंतु मुळांची वाढ न झाल्याने नंतर हे फुटवे मरून जातात. त्यामुळे ऊसतोडणी झाल्यानंतर बुडखे जमिनीलगत धारदार कोयत्याने छाटावेत, जेणेकरून उगवण जमिनीतूनच सुरू होईल.
* जमिनीलगत बुडखा छाटणी केल्यास फुटवे जमिनीतून उगवतात. मुुळांद्वारे अन्नद्रव्ये व पाणी सहज शोषले जाऊन खोडवा चांगला वाढतो.
* जमिनीलगत छाटलेल्या बुडख्यावर एक लिटर पाण्यात १ ग्रॅम कार्बेन्डाझिम अधिक ०.३६ ग्रॅम इमिडाक्लोप्रिड (७० टक्के) मिळून फवारणी करावी.

पाचट व्यवस्थापन
* ऊस तुटून गेल्यानंतर शेतामध्ये राहिलेले पाचट न जाळता त्याचा शेतात आच्छादनासाठी उपयोग करावा, सर्व सर्‍यांमध्ये पाचटाचे आच्छादन करावे.
* वरंबे मोकळे राहतील याची काळजी घ्यावी अन्यथा फुटवे कमी फुटतात.
* हेक्टरी ८ ते १० टन पाचट निघते. याचा सेंद्रिय खत म्हणून चांगला उपयोग होतो.
* शेतामध्ये ऊस पाचट कुजविण्यासाठी हेक्टरी ८० किलो युरिया, १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट व २.५ लिटर पाचट कुटविणारे द्रवरूप जिवणू संवर्धक वापरावे.
खोडव्यामध्ये पाचट आच्छादन
* मातीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढून मातीची सुपीकता आणि उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होते.
* मातीचा पोत सुधारतो, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
* मातीमध्ये उपयुक्त सूक्ष्म जिवाणूंची संख्या वाढते.
* रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढून, वापरामध्ये बचत होते.
* तण व बाष्पीभवनावर नियंत्रण होते.
* पर्यावरणपूरक व शाश्वत ऊस शेतीला चालना मिळते.
बगला फोडणे
* पहिल्या पिकाची मुळे जुनी व जीर्ण झालेली असल्यामुळे ती अकार्यक्षम झालेली असतात. जुनी मुळे तोडण्यासाठी तसेच जमीन भुसभुशीत होऊन हवा खेळती राहण्यासाठी ऊस तुटून गेल्यानंतर ८ ते १० दिवसांत बगला फोडाव्यात.
* बुडखा छाटल्यानंतर जमीन वापश्यावर असताना किंवा हलकी, मध्यम जमीन जास्त कोरडी असल्यास हलकेसे पाणी देऊन नांगरणे बगला फोडून घ्याव्यात. बगला फोडल्यामुळे जुनी मुळे तुटून नवीन मुळांच्या संख्येत चांगली वाढ होते. ही मुळे फार कार्यक्षम असतात.
* नवीन मुळे जमिनीतील अन्नद्रव्य व पाणी शोषून घेऊन फुटव्यांच्या जोमदार वाढीसाठी मदत करतात.
* जमीन ६ ते ७ दिवस उन्हात तापू द्यावी. त्यानंतर वरखते देऊन दातेरी कुळव चालवावा. यामुळे खते मातीत मिसळतात आणि नंतर पाणी द्यावे.
* पारंपरिक लाागण पद्धतीमध्ये पाचट आच्छादन करून रिकाम्या राहिलेल्या एक आड एक सरीमधील बगला अंकुश नांगराने फोडाव्यात.
नांग्या भरणे
* उसाचे उत्पादन हे एकरी उसांची संख्या आणि एका उसाचे वजन यावर अवलंबून असते.
* चांगले उत्पादन मिळवण्यासाठी एकरी ४० हजार ऊस असणे आवश्यक आहे. त्यामुळे विरळ ऊस असलेल्या ठिकाणी नांग्या भरूण घेणे आवश्यक आहे.
* ऊसतोडणी नंतर १५ ते २१ दिवसांच्या दरम्यान नांग्या भरण्याचे काम करावे.
* नांग्य भरते वेळेस रोपाचे वय दीड महिन्याचे असावे.
* रोपांची वरील पाने कात्रीने कापावीत. हाताने तोडू नयेत. वाढणारा शेंडा कापू नये.
* नांग्या भरल्यावर रोप जगेपर्यंत एक आड एक दिवस हलके पाणी द्यावे.
* भरण्यासाठी खोडव्यातील दाट असलेल्या ठिकाणच्या बेटाचा वापर सुद्धा करता येतो.
सेंद्रीय खत वापर
शेतकरी खोडव्यामध्ये सेेंद्रिय खतांचा वापर करीत नाहीत. त्यामुळे खोडवा उत्पादन दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे खोडवा उत्पादन जास्त मिळण्यासाठी, रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढण्यासाठी एकरी शेणखत १० टन किंवा कंपोस्ट खत ५ टन किंवा गांडूळ खत २ टन किंवा कारखान्याची कुजलेली मळी २ टन किंवा कोंबडी खत २ टन आणि २ किलो टायकोडर्मा, २ किलो पी.एस.बी. २ किलो के एम बी सेंद्रिय खतात मिसळून वापर करावा.
गंधक सिलिकॉन वापर
रासायनिक खतांचा पहिला हप्ता देताना २४ किलो प्रति एकर मूलद्रवी गंधक तसेच सिलिकॉनसाठी १६० किलो बगॅस राख आणि १ लिटर सिलिकॉन उपलब्ध करून देणारे जिवाणू वापरावेत.
सॉइल हेल्थ, ह्यूमिक अ‍ॅसिड
* खोडवा ठेवल्यानंतर १५, ४५, ९० आणि १२० दिवसांनी प्रति एकरी सॉइल हेल्थ १ लिटर प्रति २०० लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.
* खोडवा ठेवल्यानंतर आणि १२० दिवसांनी प्र्रति एकरी ह्यूमिक अ‍ॅसिड १ लिटर प्रति २०० लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.