उत्पादन घटण्याची शक्यता, शेतकरी आर्थिक संकटात
कडेगाव ः चालू गळीत हंगामात ऊसतोडणी मजुरांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे. त्यामुळे साखर कारखान्यांचा हंगाम लांबणीवर पडला आहे. परिणामी अनेक ठिकाणचा ऊस वेळेत गळितास गेला नसल्याने उसाला तुरे फुटलेले दिसत आहेत. त्यामुळे वजनात घट होऊन उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता आहे.
कडेगाव तालुका एकेकाळी दुष्काळी म्हणून ओळखला जायचा. परंतु आता ताकारी, टेंभू या सिंचन योजनांचे पाणी तालुक्यात दाखल झाल्याने अन्य पिकांसह ऊस लागवड क्षेत्र देखील वाढले आहे. सोनहिरा, क्रांती, रायगाव शुगर्स, ग्रीन पॉवर शुगर्स, कृष्णा, यशवंत, उदगिरी, सह्याद्री आदी साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात कडेगाव तालुका येत असल्याने हे सर्व कारखाने येथील शेतकर्यांना ऊस लागवडीसाठी प्रोत्साहन देतात. तसेच उत्पादन वाढीसाठीही थेट बांधावर जाऊन मार्गदर्शन करतात. परिणामी तालुक्यातील शेतकरी उसाची लागवड मोठ्या प्रमाणात करीत आहेत.
या तालुक्यातील बागायती शेतकर्यांचे ऊस हेच उदनिर्वाहाचे मुख्य साधन असल्याने या पिकाच्या बाबतीत कोणतीही तडजोड करताना शेतकरी दिसत नाहीत. यावर्षी उसाला कालावधीपूर्वीच तुरे फुटल्याने उत्पादनात मोठा फटका बसणार असून, बळीराजा पूर्णपणे अडचणीत येणार आहे. तेव्हा साखर कारखान्यांनी वेळेत ऊस गळितास नेणे आवश्यक आहे.
खरीप हंगाम वाया गेल्याने बळिराजाची सर्व भिस्त सध्या उसावर आहे. परंतु आता त्यालाच तुरे फुटल्याने वजन कमी भरून पोकळ बांबू तयार होऊ लागले आहेत. उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता आहे. तालुक्यातील शेतकरी जनावरांच्या चार्यासाठी उसावरच अवलंबून राहतो. तुरे आल्याने जनावरांच्या चारा टंचाईचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. परिणामी पशुधनही धोक्यात आल्याची चित्र तालुक्यात दिसत आहे. अशा रीतीने दुष्काळसदृश परिस्थितीतही येथील शेतकर्यांनी कसाबसा आपला ऊस जगवला. आता उसाला तुरे आल्याने वजनातही घट झाली आहे, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. (सकाळ, 21.01.2024)