केंद्र सरकारने अमेरिकेसाठी टॅरिफ दर कोटा अंतर्गत ८६०६ टन साखर निर्यातीला परवानगी दिली आहे, हा कोटा पुढील वर्षासाठी (२०२५) आहे.विदेश व्यापार महासंचालनालयाने बुधवारी (ता. ४) जारी केलेल्या अधिसूचनेत ही माहिती देण्यात आली आहे.
१ ऑक्टोबर २०२४ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत ही साखर अमेरिकेला निर्यात करता येईल. टॅरिफ रेट कोटा एका विशिष्ट मर्यादेमध्ये अमेरिका व युरोपियन देशांना निर्यात करण्यासाठी परवानगी देतो.
ही निर्यात नियमाच्या अधीन राहून होते. निर्यातीचे दर आणि शुल्कही काही मर्यादेपर्यंत ठरलेले असते. यामध्ये ठरल्याएवढीच साखर निर्यात करता येते. ‘अपेला’च्या शिफारशीनुसार कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर ही साखर निर्यात करता येणार आहे.
टेरिफ कोट्यास परवानगी दिली असली तरी अन्यत्र खुली निर्यात करण्यास मात्र केंद्राने निर्बंध कायम ठेवले. गेल्या ऑक्टोबरपासून हे निर्बंध कायम ठेवले असून पुढील सूचना मिळेपर्यंत ते वाढवले आहेत.
साखर उद्योगाकडून यांना साखर साठा चांगल्या प्रमाणात शिल्लक असल्याने किमान ३० लाख टन साखर निर्यातीस परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र यावर अजूनही केंद्राने सकारात्मक विचार केलेला नाही.