anekant.news@gmail.com

9960806673

ब्राझीलमधील दुष्काळ भारताच्या पथ्यावर

सांगली : आंतरराष्ट्रीय स्तरावर साखरेचे भाव आता वाढले आहेतच आणि ते टिकूनही आहेत. प्रामुख्याने जगातील कच्च्या साखरेचा प्रमुख पुरवठादार असलेला ब्राझील गेल्या वर्षीच्या पुरेशा पावसाअभावी भीषण दुष्काळाचा सामना करत आहे. यामुळे जागतिक बाजारात आता भारताला साखर निर्यात तसेच इथेनॉल विक्री याबाबत चांगली संधी आहे.

जगात उसाचे एकूण उत्पादन दरवर्षी 1 हजार 700 लाख टनाच्या घरात होते. यापैकी ब्राझीलमध्येच 720 लाख टन होते. ब्राझीलमध्ये उसाचे पीक हे पूर्णपणे पावसावर अवलंबून राहते. आता दुष्काळामुळे तेथे उसाचे उत्पादन आणि उत्पादनात घट होणार हे स्पष्टच आहे. त्याचप्रमाणे प्रदीर्घ दुष्काळामुळे अनेकदा उसाला आग लागते. परिणामी उसाची गुणवत्ता खराब होते. त्याखेरीज जळालेला ऊस साखर उत्पादनासाठी अयोग्य बनतो. अशीच स्थिती ब्राझीलमध्ये झाली आहे.सन 2023-24 च्या हंगामात ब्राझीलचे ऊस उत्पादन 660 दशलक्ष टनांवर पोहोचले होते; तर साखरेचे उत्पादन 42 दशलक्ष मेट्रिक टन होते. मात्र, यंदा उसाचे उत्पादन 600 दशलक्ष मेट्रिक टनांनी आणि साखरेचे उत्पादन 39 दशलक्ष टन इतकेच होईल, असे अभ्यासक सांगतात. त्याचप्रमाणे दुष्काळामुळे उसाची लागवड थांबली आहे, ज्यामुळे 25-26 हंगामासाठी उसाचे उत्पादन आणखी कमी होईल. नोव्हेंबर ते मार्च या पावसाळ्यात नवीन ऊस लागवड केली जाईल. परंतु हा नवीन ऊस 26-27 या हंगामातच उपलब्ध होईल. परिणामी पुरवठा टंचाईमुळे साखरेचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे. ब्राझीलमध्ये गळीत हंगाम हा वर्षभर सुरूच असतो. संपूर्ण देशभरात 429 साखर कारखाने आहेत. प्रामुख्याने उत्तर भागात सप्टेंबर ते मार्च या कालावधीत तर एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत मध्य दक्षिण भागात गळिताचे प्रमाण जास्त राहते.

देशात इथेनॉल उद्योगात 50 हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक झाली आहे. त्यामुळे साखरेच्या निर्यातीपेक्षा इथेनॉल उत्पादनाला प्राधान्य देऊन या गुंतवणुकीचा वापर करणे हा व्यवहार्य पर्याय ठरू शकतो. अर्थात गेल्यावर्षी उसाची लागवड मंदावली होती आणि लागवडीखालील क्षेत्र कमी होते. मात्र यंदा सतत आणि सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याने ऊस उत्पादन सामान्य होणार आहे. परिणामी या हंगामात गतवर्षीच्या तुलनेत उसाचे उत्पादन 7-8 टक्के जास्त होईल, असा अंदाज आहे