राज्यात सहकारी साखर कारखान्यांमध्ये पंधरा हजार कोटींच्या प्राप्त कराचा वाद होता. तो आमच्या सरकारने संपवला. तर नव्या ४६ हजार कोटींचा कर कमी करण्याचे काम मोदी सरकारने केले आहे.
राज्यात सहकारी साखर कारखान्यांमध्ये पंधरा हजार कोटींच्या प्राप्त कराचा वाद होता. तो आमच्या सरकारने संपवला. तर नव्या ४६ हजार कोटींचा कर कमी करण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. यासह राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या माध्यमातून देशभरातील साखर कारखान्यांना १० हजार कोटींचा कर्जपुरवठा केला आहे. इथेनॉल ब्लेंडिंगच्या माध्यमातून पुन्हा एकदा साखर कारखान्यांना उत्पन्नवाढीचे प्रकल्प बनवण्याचे काम सुरू असून त्यासाठी पाठबळ दिले जात आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांनी केले.
या प्रसंगी शहा बोलत होते. व्यासपीठावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, शिक्षणमंत्री दादाजी भुसे, मंत्री नरहरी झिरवाळ, पणनमंत्री जयकुमार रावल, माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, माजी केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार, माजी खासदार डॉ. विकास महात्मे,आमदार छगन भुजबळ, दिलीप बोरसे, स्वामी संविदानंद सरस्वती, व्यंकटेश्वरा कंपनीचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव डोळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या वेळी अजंग येथे व्यंकटेश्वरा संस्थेची माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा तसेच बेळगाव येथील उभारलेल्या काजू प्रक्रिया उद्योगाचे ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले.
शाह म्हणाले, ‘‘देशात सहकार चळवळीच्या वतीने सहकार मंत्रालय स्थापन करण्याची मागणी होती. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ती मान्य केली. त्यातून शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी मोठा फायदा होत आहे. आत्मनिर्भरतेची सुंदर व्याख्या म्हणजेच सहकार आहे. सहकाराशिवाय शेतकरी समुदाय आत्मनिर्भर, विकसित आणि समृद्ध बनू शकत नाही. त्यासाठी ‘सहकारातून समृद्धी’ हा नरेंद्र मोदी यांनी नारा दिला आहे. सहकाराच्या बळकटीकरणासाठी सहकारी संस्थांचे संगणकीकरण, गोदामांची निर्मिती यासह बहुआयामी बनवण्याचे काम केले जात आहे. सहकार चळवळ आणि तंत्रज्ञानाची सांगड घातल्यास शेती फायद्याची होऊ शकते.’’सेंद्रिय प्रमाणीकरण नसल्यास चांगला परतावा मिळत नाही. सहकार मंत्रालयाने सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पॅकेजिंग व मार्केटिंगसाठी भारत ऑरगॅनिक को-ऑप लिमिटेडची निर्मिती केली आहे. या माध्यमातून सेंद्रिय उत्पादनांची खरेदी करून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री केली जाईल. त्यातून मिळणारा नफा थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी हा दृष्टिकोन असल्याचे शाह या वेळी म्हणाले.