राज्य साखर आयुक्तांचे आवाहन
सोलापूर: तुम्हाला आवश्यक ती वीज मिळेल शिवाय उर्वरित वीज विक्रीतून पैसे मिळतील म्हणून तुम्ही उपलब्ध असलेल्या जमिनीवर, गोडाऊन व इमारतीवर सौर प्रकल्पांची उभारणी करावी असे आवाहन राज्याच्या साखर आयुक्तांनी केले आहे. येत्या काही वर्षात राज्यातील २३० साखर कारखान्यांवर सौरऊर्जा प्रकल्प उभारणी होणार असल्याचेही साखर आयुक्त कार्यालयाने सांगितले.
सध्या दिवसा वीज मिळणे कठीण झाले आहे. वरचेवर विजेचा वापर वाढत असताना पुरेशी व दिवसा वीज मिळणे कठीण झाले आहे. पर्याय म्हणून शासन सौर उर्जा प्रकल्पातून वीज तयार करण्यावर भर देत आहे. राज्यात जवळपास २३० साखर कारखाने आहेत. यातील पश्चिम महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील बहुतेक साखर कारखाने सोडले तर राज्यातील इतर साखर कारखान्यांच्या मालकीची शेतजमीन आहे. या जमीनी उपयोगात आणण्यासाठी सौर ( सोलर) प्रकल्प राबविण्याचे आवाहन साखर आयुक्तांनी केले आहे.
साखर कारखाने व शेतकऱ्यांना शिल्लक जमिनीवर सोलर प्रकल्प उभारले तर होणाऱ्या फायद्याची माहिती कारखान्यांच्या अधिकार्यांच्या बैठकीत दिली आहे. एक मेगावॉटचा सोलर प्रकल्प उभारण्यासाठी तीन ते चार कोटी रुपये खर्च येतो. साखर कारखान्यांनी स्वत: सोलर प्रकल्प उभारावेत अथवा आमच्याशी संपर्क केला तर ऊर्जा विभागाला आम्ही जोडून देण्यात येईल. ज्यांच्याकडे को-जन प्रकल्प नाही त्यांना वीज मिळेल व आहे त्यांना बंद काळात वीज मिळणार असल्याचेही साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी सांगितले. (लोकमत १९.६. २०२४)