anekant.news@gmail.com

9960806673

फेब्रुवारीसाठी २२.५० लाख टन साखर विक्री कोटा

केंद्राने फेब्रुवारी महिन्यासाठी देशातील साखर कारखान्यांना २२.५० लाख टनांचा साखर विक्री कोटा जाहीर केला आहे. जानेवारीसाठी इतकाच कोटा केंद्राने जाहीर केला होता. केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने बुधवारी (ता.२९) ‘एक्स’ अकाउंटवरून याबाबतची माहिती दिली.दहा लाख टन साखर निर्यातीच्या केंद्राच्या परवानगीनंतर इथेनॉल दरवाढीच्या निर्णयाबाबत ही सकारात्मकता निर्माण झाली आहे. याचा अनुकूल परिणाम येत्या काही महिन्यांत साखर दरावर होण्याची शक्यता आहे.
यंदाचा हंगाम सुरू झाल्यानंतर शेवटच्या टप्प्यात केंद्राने साखर उद्योगाबाबत सकारात्मक हालचाली करण्यास सुरुवात केली आहे.निर्यातीच्या निर्णयानंतर केंद्र साखर उद्योगासाठी काहीतरी करत आहे, या वातावरणामुळे साखर बाजार ही क्विंटलला शंभर ते दोनशे रुपयांनी वधारला आहे. सध्या कारखानदार जागतिक मिळणारा दर, वाहतूक खर्च याबाबत अंदाज घेत असून, येत्या काही दिवसांत निर्यातीसाठी साखर बंदरापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे
अजूनही बहुतांशी कारखानदार साखरदराबाबत अंदाज घेण्यातच गुंतलेले आहेत. काही कारखानदार प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या स्थानिक बाजारातील दर वाढत आहेत. या तुलनेत जागतिक बाजारात किती दर आहेत हे पाहून किती निर्यात करायची याबाबत माहिती घेण्यात येत आहे.

बाजार विश्‍लेषकांनी येत्या काही महिन्यात उन्हाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर व साखर घटीच्या अंदाजामुळे साखरेचे दर वाढतील अशी माहिती दिली. साखर कारखानदारही दर वाढण्याच्या प्रतीक्षेत असून तातडीने निर्यातीचा निर्णय विचार करूनच घेण्यात येत असल्याचे कारखाना सूत्रांनी सांगितले. सध्या तरी निर्यातीबाबत केवळ माहिती घेऊन कोट्यानुसार साखर तयार ठेवण्याचे प्रयत्न कारखानदाराकडून होत आहेत.
साखर कमी उत्पादित होणार हे लक्षात येऊनही निर्यातीस परवानगी दिल्याने साखर बाजारात मात्र सध्या उत्साह असल्याचे चित्र आहे. अजून देशात थंडीचे प्रमाण कमी-अधिक असल्याने साखरेच्या खरेदीसाठी शीतपेय, आइस्क्रीम क्षेत्रातील औद्योगिक कंपन्या अजून मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्या नाहीत. साखरेचे दर वाढू लागताच या कंपन्या भविष्यात जादा दराने साखर खरेदी करावी लागेल या शक्यतेने लवकरच साखर खरेदी करतील अशीही शक्यता साखर उद्योगातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे, यामुळे साखरेच्या दरात वाढ कायम राहण्याचा अंदाज असल्याचे सांगण्यात आले.