वाळवा ः हुतात्मा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी अखेर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. कारखान्याची झालेली आर्थिक दुरवस्था, वाढते कर्ज आणि कथित गैरकारभाराला अध्यक्षच जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याासाठी गेले ४५ दिवस कारखान्यासमोर शेतकरी सभासद आणि विरोधी संचालकांचे बेमुदत ठिय्या आंदोेलन सुरू होते. या सातत्यपूर्ण संघर्षानंतर अखेर वैभव नायकवडी यांना पद सोडावे लागले आहे.
काही दिवसांत कारखान्याच्या मासिक व साप्ताहिक बैठकांमध्ये अभूतपूर्व गोंधळ उडाला होता. संतप्त सभासदांच्या रोषाला सामोरे जावे लागल्याने वैभव नायकवडी यांना बैठकांमधून पोलीस संरक्षणात बाहेर पडावे लागले होते. त्यातच संचालक मंडळाने ठराव मंजूर करून त्यांचे सर्व अधिकार आधीच काढून घेत ते उपाध्यक्ष रामचंद्र भाडळकर यांच्याकडे सुपूर्द केले होते. चारही बाजूंनी वाढणारा कायदेशीर तपास, सहकार क्षेत्रातील दबाव आणि कारखान्याबाहेरील शेतकर्यांचा संताप यामुळे अखेर आज हा राजीनामा देण्यात आला.
दरम्यान वैभव नायकवडी म्हणाले, मी कोणत्याही पदावन नसताना शेतकर्यांसाठी काम केले आहे. या उद्योगावर अवलंबून असणार्या शेतकरी, कामगारांच्या कुंटुंबांच्या आर्थिक उन्नतीसाठी मी इथून पुढेही कार्यरत राहणार आहे. आंदोलन थांबावे यासाठी देखील मी चर्चा करण्याची तयारी दर्शवली होती. या उद्योगावर परिणाम होऊ नये व त्यावर अवलंबून असणार्या शेतकरी, कामगार यांच्या आर्थिक प्रगतीसाठी विचार करून मी राजीनामा देत आहे. (पुण्यनगरी, ०३.०६.२०२६)